
जळगाव,, 18 सप्टेंबर (हिं.स.) राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान पौष्टिक तृणधान्य (श्रीअन्न) उपअभियानांतर्गत रब्बी हंगाम २०२६-२७ साठी रब्बी ज्वारी पिकाच्या प्रमाणित बियाणे वितरणासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
रब्बी ज्वारी पिकासाठी १० वर्षाआतील प्रमाणित बियाणे वितरणास प्रति क्विंटल ३ हजार रुपये अनुदान असून, त्यासाठी १ हजार ४५० क्विंटलचा भौतिक लक्षांक प्राप्त झाला आहे. तसेच १० वर्षावरील प्रमाणित बियाणे वितरणास प्रति क्विंटल १ हजार ५०० रुपये अनुदान असून, त्यासाठी १ हजार २१० क्विंटलचा भौतिक लक्षांक प्राप्त झाला आहे.
या बाबीसाठी लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्जाद्वारे करण्यात येणार आहे. महाडीबीटी च्या https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/ या पोर्टलवर बियाणे या टाईल अंतर्गत बियाणे घटकामध्ये रब्बी ज्वारी पिकासाठी प्रमाणित बियाणे वितरण या बाबीसाठी शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषि क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था यांनी या घटकासाठी अर्ज करावा.
शेतकरी गटाची नोंदणी ३१ मार्च २०२६ पूर्वी झालेली असणे आवश्यक आहे. गटाची निवड प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) तत्त्वावर करण्यात येईल. प्रति गट कमाल २५ शेतकरी व प्रति गाव, प्रति पिक जास्तीत जास्त २ गटांची निवड करण्यात येईल. लाभार्थी शेतकरी सभासदाकडे अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे. तसेच शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांनी हमीपत्र देणे बंधनकारक राहील.
तरी जास्तीत जास्त शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर