‘काय बच्चू, तू गप्प का?’; कडूंच्या निवासस्थानी शासन-प्रशासनाचे कान टोचणारा गणपतीचा देखावा
अमरावती, 18 सप्टेंबर (हिं.स.) ‘बालबळींचा हुंकार, वाघाचा वार, रानडुकरांचा कहर’; विविध प्रश्नांवर प्रतीकात्मक गणपतीतून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्नबच्चू कडू यांच्या निवासस्थानी अनोखा गणपती देखावा ‘काय बच्चू, तू गप्प का? सरकार करत नसेल तर काढ आपले
‘काय बच्चू, तू गप्प का?’; कडूंच्या निवासस्थानी शासन-प्रशासनाचे कान टोचणारा गणपतीचा देखावा


अमरावती, 18 सप्टेंबर (हिं.स.)

‘बालबळींचा हुंकार, वाघाचा वार, रानडुकरांचा कहर’; विविध प्रश्नांवर प्रतीकात्मक गणपतीतून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्नबच्चू कडू यांच्या निवासस्थानी अनोखा गणपती देखावा

‘काय बच्चू, तू गप्प का? सरकार करत नसेल तर काढ आपले आंदोलनाचे शस्त्र!’ या आशयाच्या ज्वलंत संदेशातून आमदार बच्चू कडू यांच्या कुरळपूर्णा येथील निवासस्थानी यंदाचा गणपती देखावा साकारण्यात आला आहे. शासन आणि प्रशासनाचे विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी उभारण्यात आलेल्या या प्रतीकात्मक देखाव्यातून शेतकरी, शेतमजूर आणि वंचित घटकांच्या समस्यांना वाचा फोडण्यात आली आहे.‘बालबळींचा हुंकार, वाघाचा वार, रानडुकरांचा कहर; गणराया, तूच वाचव आमचं वावर अन् संसार!’ अशी या देखाव्याची मध्यवर्ती थीम आहे. तीन दिवसांसाठी उभारण्यात आलेल्या या प्रतीकात्मक गणपतीच्या माध्यमातून समाजातील ज्वलंत प्रश्न मांडण्यात आले आहेत. विविध प्रश्नांचे फलक, प्रतिकात्मक मांडणी आणि संदेशांच्या माध्यमातून शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊटबॉर्न युनिटला लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचाही या देखाव्यातून निषेध करण्यात आला आहे. रुग्णालयांमधील सुरक्षितता, प्रशासनाची जबाबदारी आणि आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींचा प्रश्न यानिमित्ताने अधोरेखित करण्यात आला आहे.त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यांमध्ये नागरिकांचा झालेला मृत्यू, वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे नुकसान, रानडुकरांचा वाढता उपद्रव आणि त्यातून निर्माण झालेली शेतकऱ्यांची चिंता या प्रश्नांनाही देखाव्यात स्थान देण्यात आले आहे. वन विभागाच्या कार्यपद्धतीकडे आणि वन्यप्राणी-मानव संघर्षाकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.बियाण्यांच्या उपलब्धतेचा प्रश्न, शेतीचे नुकसान आणि शेतकऱ्यांसमोरील विविध अडचणींसोबतच शेतमजूर, दिव्यांग, एकल महिला आणि विधवा यांच्या प्रश्नांवरही या देखाव्यातून भाष्य करण्यात आले आहे. विविध विभागांच्या दुर्लक्षामुळे संबंधित घटकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा प्रतीकात्मक निषेध या माध्यमातून करण्यात आला आहे.गणेशोत्सवाच्या पारंपरिक भक्तीमय वातावरणात सामाजिक आणि प्रशासकीय प्रश्न मांडत, पीडित नागरिकांच्या व्यथा शासनापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले. ‘सरकार करत नसेल तर आंदोलनाचे शस्त्र उचलू’ या संदेशातून प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनावर दबाव निर्माण करण्याचा इशाराही या देखाव्यातून देण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande