
अमरावती, 19 सप्टेंबर (हिं.स.)।दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेत मोठ्या प्रमाणावर गर्दी असून, पुणे आणि मुंबईहून बडनेरा, नागपूरकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांसाठी जागा उपलब्ध नाही. यामुळे प्रवाशांना तत्काळ तिकिटाचा आधार घ्यावा लागणार आहे किंवा खाजगी बसगाड्यांचा पर्याय निवडावा लागणार आहे. अनेक गाडयांची प्रतीक्षा यादी ही १५० पेक्षाही जास्त झाली आहे. तरीही प्रवासी प्रतीक्षेची तिकिटे काढत आहेत.
दोन महिन्यांपुर्वीचे तिकीट काढूनही..
नोव्हेंबर महिन्यात दिवाळी असल्यामुळे बाहेरगावी असलेली अनेक कुटुंबे आपल्या गावी येण्यासाठी रेल्वे आरक्षणाच्या प्रयत्नात असतात. त्यामुळे त्यांनी सुमारे दोन महिन्यापूर्वीच रेल्वे गाड्यांच्या प्रवासाचे आरक्षण करून ठेवले आहे. ४ नोव्हेंबरपासून रेल्वे गाड्यांना मोठया प्रमाणात गर्दी दिसत आहे. रेल्वेचे आरक्षण खुले झाल्याबरोबर अनेक प्रवासी आरक्षण करण्यासाठी धाव घेतात, पण त्यांना ‘वेटिंग लिस्ट’चे तिकीटच हाती येत आहे. ऑनलाईन बुकिंगमध्येही प्रवाशांना हाच अनुभव येत आहे.
आरक्षण ‘हाऊसफुल्ल’
दिवाळीच्या काळात आझाद हिंद एक्स्प्रेस, पुणे-अमरावती, पुणे-काझिपेठ, पुणे-बिलासपूर, पुणे-नागपूर, गीतांजली एक्स्प्रेस, विदर्भ एक्स्प्रेस, मुंबई-अमरावती एक्स्प्रेस, शालिमार एक्स्प्रेसच्या गाडय़ांचे आरक्षण बऱ्याच दिवसांपासून हाऊसफुल्ल झाले आहे. यामुळे प्रवाशांना संबंधित दिवसाचे तिकीट मिळत नसल्याने ते तत्काळ तिकिटाच्या भरवशावर प्रवासाचे नियोजन करीत आहेत. १८ नोव्हेंबरपर्यंत अनेक गाड्यांमध्ये कन्फर्म तिकीट उपलब्ध नाही.
दिवाळीच्या काळात प्रवाशांची गर्दी पाहून विशेष गाड्यांचे नियोजन रेल्वे प्रशासन करीत असते, पण या गाड्या ऐनवेळी घोषित केल्या जातात, तोपर्यंत प्रवासी पर्यायी साधनांची निवड करून ठेवतात. विशेष गाड्यांचे तिकीट दर नियमित गाड्यांपेक्षा अधिक राहत असल्याने आणि या गाड्या वेळेवर धावत नसल्याने अनेक प्रवासी साधारण तिकीट काढून स्टेशनवर जी गाडी येईल त्या गाडीने जाण्यावाचून पर्याय नसतो. हॉलिडे स्पेशल गाड्या विलंबाने धावत असल्याने प्रवाशांचा जास्त ओढा या गाड्यांकडे नसतो.
प्रवाशांचा हिरमोड
हिंदू संस्कृतीत दिवाळी सणाचे विशेष महत्त्व आहे. घरापासून लांब असलेली कोणतीही व्यक्ती दिवाळी सण कुंटुबीयांसह साजरा करण्यासाठी गावी परत येते. यंदा लक्ष्मीपूजन ८ नोव्हेंबर रोजी आहे. मात्र, लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये नोव्हेंबर महिन्यात आरक्षण मिळत नसल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. दिल्ली, मुंबई, चैन्नई, अहमदाबाद, पुणे, हावडा आदी मार्गावर ये-जा करणाऱ्या गाड्यांमध्ये २० नोव्हेंबरपर्यंत आरक्षण नाही, असे दिसून आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी