
अमरावती, 19 सप्टेंबर (हिं.स.)
पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. पिके हातातून जाण्याची भीती निर्माण झाली असताना अखेर कृषिमंत्री जिल्ह्यातील पिक परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात रविवारी (ता. २०) यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत जिल्ह्यातील पिकांची सद्यस्थिती, पावसातील खंड आणि शेतकऱ्यांसमोरील संकटावर चर्चा होणार आहे.
निर्णयाची अपेक्षा जिल्ह्यातील शेतकरी सध्या केवळ बैठका आणि आढाव्यांवर समाधान मानण्याच्या स्थितीत नाही. पिकांचे नुकसान होत असताना प्रत्यक्ष मदत, पाण्याची उपलब्धता आणि शासनाच्या योजनांचा लाभ वेळेत मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे अकोल्यातील बैठकीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या बैठकीसाठी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांना बोलविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांचा यात समावेश आहे. त्यामुळे बैठकीत पिक परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. जिल्ह्यात यंदा पावसातील खंडामुळे खरीप हंगाम अडचणीत आला आहे. कापूस, सोयाबीन, तूर यांसारख्या प्रमुख पिकांवर पाण्याअभावी संकट निर्माण झाले आहे. अनेक भागांत पिकांना आवश्यक ओलावा मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पिकांवर खर्च केलेला पैसा आणि मेहनत वाया जाण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत कृषिमंत्र्यांची बैठक होत असल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पिकांचे नुकसान, पावसाची स्थिती, सिंचनाची उपलब्धता आणि रोजगार हमीच्या माध्यमातून आवश्यक उपाययोजना यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
पाऊस नसल्याने पिकांची प्रतिकारक्षमता कमी झाली आहे. अशा परिस्थितीत औषधांचा खर्च करूनही उत्पादनाची हमी नसल्याने अनेक शेतकरी फवारणीपासून दूर जात आहेत. आधीच पिकांवर मोठा खर्च केला आहे. आता फवारणी केली तरी पीक घरी येईल याची खात्री नाही. त्यामुळे आणखी पैसे खर्च करण्याची हिंमत होत नाही, अशी व्यथा शेतकरी व्यक्त करीत आहेत. उभ्या पिकांकडे पाहून पुढील काही दिवसांत काय मिळणार, याचा अंदाज शेतकऱ्यांना येत नाही. त्यामुळे एकेकाळी हिरव्या शिवारातून उत्पन्नाचे स्वप्न पाहणारा शेतकरी आता नुकसान किती होणार, याचीच चिंता करीत आहे. पावसाची आस आणि पिकांच्या भवितव्याची चिंता यामुळे शेतकऱ्यांचे डोळे पुन्हा आभाळाकडे लागले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी