
छत्रपती संभाजीनगर, 02 सप्टेंबर (हिं.स.)। मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ (SIR) अंतर्गत धाराशिव तालुक्यातील मतदान केंद्रनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांनी या यादीत स्वतःसह कुटुंबातील सर्व पात्र सदस्यांची नावे समाविष्ट असल्याची खात्री करावी.नाव नसल्यास फॉर्म क्रमांक ६ द्वारे नवीन मतदार नोंदणी करता येणार असून,मतदार यादीतील तपशिलात बदल करावयाचा असल्यास फॉर्म क्रमांक ८ भरता येणार आहे,असे आवाहन निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेला मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR)-२०२६ सध्या धाराशिव तालुक्यात राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांची नियुक्ती करण्यात आली होती. संबंधित बीएलओंना नेमून दिलेल्या मतदार यादी भागातील मतदारांकडून गणनापत्रक अर्थात Enumeration Form (EF) भरून घेण्यात आले आहेत.
मतदान केंद्रनिहाय प्रारूप यादी प्रसिद्ध
भारत निवडणूक आयोगाच्या सुधारित सूचनांनुसार २४१-तुळजापूर विधानसभा आणि २४२- उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट असलेल्या धाराशिव तालुक्यातील मतदान केंद्रनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
ही प्रारूप मतदार यादी नागरिकांना पाहण्यासाठी निवडणूक शाखा, तहसील कार्यालय,धाराशिव येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.त्याचबरोबर संबंधित मतदार यादी भागाच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडेही यादी उपलब्ध आहे.नागरिकांना धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरही ही प्रारूप मतदार यादी पाहता येणार आहे.
कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे तपासा
प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये नागरिकांनी स्वतःचे तसेच आपल्या कुटुंबातील सर्व पात्र सदस्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी.ज्या पात्र मतदाराचे नाव प्रारूप मतदार यादीत समाविष्ट नाही,अशा मतदारांना भारत निवडणूक आयोगाच्या Voters’ Service Portal (voters.eci.gov.in) या संकेतस्थळावर किंवा ECINET Mobile App वर फॉर्म क्रमांक ६ भरून आवश्यक कागदपत्रांसह नवीन मतदार नोंदणी करता येणार आहे.
तपशिलातील बदलासाठी फॉर्म-८
ज्या मतदारांचे नाव मतदार यादीत आहे.मात्र त्यामधील तपशिलात काही बदल किंवा दुरुस्ती करावयाची आहे,अशा मतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म क्रमांक ८ भरावा.
मतदारांनी प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यातील आपले नाव आणि तपशील तपासून घेणे महत्त्वाचे असून,आवश्यक असल्यास निर्धारित प्रक्रियेनुसार अर्ज करून मतदार नोंदणी अथवा तपशिलातील दुरुस्ती करून घ्यावी.याबाबत २४१-तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी,धाराशिव आणि २४२-उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी,कळंब यांनी नागरिकांना जाहीर आवाहन केले आहे.
ही माहिती सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार,धाराशिव यांच्या निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.अधिक माहितीसाठी तहसील कार्यालय,जिल्हाधिकारी कार्यालय परिसर,धाराशिव येथील निवडणूक शाखेशी संपर्क साधता येईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis