
इस्लामाबाद, 20 सप्टेंबर (हिं.स.)।पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या बहीण अलीमा खान यांना त्यांच्या घराबाहेरून जबरदस्तीने अटक करण्यात आली आहे. अलीमा खान सातत्याने तुरुंगात इमरान खान यांच्यासोबत होत असलेल्या वर्तणुकीविरोधात आवाज उठवत आहेत. त्यांनी नुकतेच या मुद्द्यावर स्पष्टपणे आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर काही दिवसांतच शहबाज शरीफ सरकारच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
लाहोरच्या उपायुक्तांनी सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासंदर्भातील कायद्यांतर्गत दिलेल्या आदेशानुसार, अलीमा खान यांना ३० दिवसांसाठी ताब्यात ठेवता किंवा अटक करता येऊ शकते. आदेशात म्हटले आहे की, आज लाहोरच्या उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा गुप्तचर समितीची बैठक झाली. शहरातील शांतता आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी इम्रान खान यांच्या बहीण अलीमा खानम यांना ताब्यात घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब पोलिसांनी अलीमा खान यांना त्यांच्या घराबाहेरून जबरदस्तीने ताब्यात घेतले आहे. मात्र, त्यांना आणि त्यांच्या चालकाला नेमके कुठे नेण्यात आले आहे, याची अद्याप माहिती मिळालेली नाही. तसेच त्यांच्या अटकेचे कारणही स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या कुटुंबीयांनी आणि कायदेशीर प्रतिनिधींनी अलीमा खान यांच्या ठिकाणाची माहिती, त्यांना ताब्यात घेण्यामागील कायदेशीर आधार आणि कोणत्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे, याची माहिती देण्याची मागणी केली आहे.
पीटीआयच्या पंजाबमधील प्रवक्त्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या बहीण अलीमा खान यांना २७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफच्या (पीटीआय) लाँग मार्चपूर्वी लाहोरमधील त्यांच्या घरातून अटक करण्यात आली आहे.
वृत्तसंस्थाच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी पोलिसांनी २७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या पीटीआयच्या प्रस्तावित आंदोलनापूर्वी पक्षाच्या चार कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. इमरान खान यांची तातडीने सुटका करावी, ही या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे. ऑगस्ट २०२३ पासून इम्रान खान तुरुंगात आहेत.
दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इस्लामाबाद पोलिसांनी कारवाईला वेग दिला आहे. सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आणि आंदोलनादरम्यान गोंधळ घडवून आणण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना रोखण्यासाठीच्या नियोजनाबाबत इस्लामाबादच्या केंद्रीय पोलिस कार्यालयात बैठक घेण्यात आली. वृत्तानुसार, संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी या बैठकीत सहभाग घेतला आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा केली.
राजधानीतील पोलिस आंदोलनासंदर्भात माहिती गोळा करत आहेत. यामध्ये पक्षाची तयारी तसेच त्यांचे नेते, कार्यकर्ते आणि आंदोलनाशी संबंधित कार्यकर्त्यांच्या हालचालींची माहिती घेण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode