
इस्लामाबाद , 20 सप्टेंबर (हिं.स.)।पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात सुरक्षा दलांनी मोठी कारवाई करत पाच दहशतवाद्यांना ठार केल असून २३ जणांच्या अपहरणाचा प्रयत्न पूर्णपणे हाणून पाडला आहे. लष्कराच्या माध्यम शाखेने, इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने (आयएसपीआर) रविवारी या कारवाईला दुजोरा दिला.
आयएसपीआरनुसार, १८-१९ सप्टेंबरच्या रात्री कलातजवळ चमन-कराची राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. दहशतवाद्यांनी खंडणीसाठी अपहरण, जबरदस्तीने वसुली आणि वाहनांची लूट करण्याच्या उद्देशाने महामार्गावर बेकायदेशीर तपासणी नाका उभारला होता. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला होता.
दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी तातडीने कारवाई केली. दोन्ही बाजूंमध्ये झालेल्या तीव्र चकमकीनंतर पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या ठिकाणावर छापा टाकून अपहरण केलेल्या २३ नागरिकांची सुरक्षित सुटका केली. घटनास्थळावरून सहा ट्रक, तीन बस आणि दोन कारही जप्त करण्यात आल्या. दहशतवाद्यांनी ही वाहने आपल्या ताब्यात घेतली होती. याशिवाय मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारुगोळा आणि स्फोटक साहित्यही जप्त करण्यात आले.
आयएसपीआरनुसार, परिसरात उर्वरित दहशतवाद्यांचा पूर्णपणे खात्मा करण्यासाठी तसेच प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आणि स्थानिक नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आसपासच्या भागात शोधमोहीम सुरू आहे.परदेशी पाठिंबा मिळणाऱ्या दहशतवादाचा मुळापासून नायनाट करण्यासाठी दहशतवादविरोधी कारवाया पूर्ण निर्धाराने सुरूच राहतील, असे लष्कराने पुन्हा स्पष्ट केले आहे.बलुचिस्तानला दीर्घकाळापासून गंभीर सुरक्षा आव्हाने आणि दहशतवादी हल्ल्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सुरक्षा दलांनी आपल्या कारवायांचा वेग वाढवला आहे.
पाकिस्तान इन्स्टिट्यूट फॉर कॉन्फ्लिक्ट अँड सिक्युरिटी स्टडीजच्या मासिक अहवालानुसार, प्रांतातील दहशतवादी घटनांमध्ये ७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जुलै महिन्यातील ८३ हल्ल्यांची संख्या वाढून ऑगस्टमध्ये ८९ झाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode