
मुंबई, 20 सप्टेंबर (हिं.स.)। मुंबईतील यंदाच्या गणेशोत्सवाला लागलेले विघ्न काही केल्या थांबताना दिसत नाही. मुंबईतील परळ-काळाचौकी परिसरात शनिवारी मध्यरात्री महागणपतीच्या मंडपाजवळ विजेचा झटका लागून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून, चौघे जखमी झाले आहेत. मृतांमध्ये आठ वर्षीय रागिणी घनश्याम यादव आणि ३३ वर्षीय सुजाता यांचा समावेश आहे. या घटनेमुळे लालबाग-परळ परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी रात्री अडीचच्या सुमारास काळाचौकीच्या दत्ताराम लाड मार्गावरील महागणपती उत्सव मंडळाच्या मंडपाजवळ ही दुर्घटना घडली. गणेशदर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक परिसरात आले होते. मंडपाच्या समोर तात्पुरता शीतपेयांचा स्टॉल उभारण्यात आला होता. या स्टॉलसाठी वीजजोडणी घेण्यासाठी लाल रंगाची विद्युत तार सोडण्यात आली होती. या तारेवर पाय पडल्याने काही जणांना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. या दुर्घटनेत एकूण सहा जण जखमी झाले.
प्राथमिक माहितीनुसार, जखमींमध्ये अकबर नाईक (19), तन्वी नर्श हांडे (19), साहिल संदीप तरे (19) आणि रुही सिंग (12) यांचा समावेश असून, जखमींना तातडीने जवळच्या मसीना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी काही जणांवर अतिदक्षता कक्षात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. तर १२ वर्षीय रुही सिंह हिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला परळ येथील ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान आठ वर्षीय रागिणीचा मृत्यू झाला. तसेच ३३ वर्षीय सुजाताचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मृत चिमुकलीची मावशी किस्मती यादव म्हणाल्या, “आम्ही दोन वाजता रांगेत उभे राहिलो होतो. २.४० मिनिटांनी ही दुर्घटना घडली. तिथे गर्दी होती म्हणून आम्ही माघारी फिरलो. तिथून घरी जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आम्ही बाजूने निघून जात होतो. मंडपाच्या शेजारीच एक दुकान आहे. मग आम्ही विचार केला की दुकानाजवळ उभं राहूयात. गर्दी कमी झाली की दर्शन घ्यायला जाऊया. त्यांनी लाईट लावली, बाजूलाच मंडप आहे. मंडळाने सुरक्षेची काळजी घ्यायला हवी होती. तुम्ही एवढी मोठी गणपतीची मूर्ती बसवता मग सुरक्षा का ठेवत नाहीत. ज्यांचं बाळ गेलंय, त्यांना तर ते परत मिळणार नाहीय.” असा संताप व्यक्त करण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. रविवारी सकाळी बेस्टच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित मीटरचा वीजपुरवठा खंडित केला. विद्युत तार नेमकी कशी उघडी राहिली आणि त्यातून भाविकांना विजेचा धक्का कसा बसला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या दुर्घटनेमुळे लालबाग-परळ परिसरावर शोककळा पसरली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule