
वॉशिंग्टन, 20 सप्टेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे की, ते ‘एआय फोर्स’ उभारण्याच्या तयारीत असून लवकरच ‘एआय सीझर’च्या नियुक्तीची घोषणा करणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) क्षेत्र ‘संपुष्टात येऊ देण्यासाठी किंवा नष्ट होऊ देण्यासाठी’ आपण शांत बसणार नसल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
ट्रम्प यांनी आपल्या ‘ट्रुथ सोशल’ खात्यावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अमेरिका या महत्त्वपूर्ण उद्योगाच्या विकासात कोणत्याही प्रकारे अडथळा आणणार नाही किंवा त्याची प्रगती रोखणार नाही. ते म्हणाले, “या अविश्वसनीय उद्योगाच्या विकासात आम्ही कोणत्याही प्रकारे अडथळा आणणार नाही किंवा त्याला दडपणार नाही. त्याऐवजी, आम्ही त्याला महत्त्व देऊ, त्याला मदत करू आणि त्याचा विस्तार होत असताना त्यावर लक्ष ठेवू. मात्र, चुकीच्या किंवा बेकायदेशीर कृत्यांवरही आम्ही लक्ष ठेवू आणि विद्यमान फौजदारी व दिवाणी न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून त्यावर सहज कारवाई करू शकतो.”
डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१९ मध्ये अंतराळ क्षेत्रात अमेरिकेचे वर्चस्व वाढवण्यासाठी ‘स्पेस फोर्स’ची स्थापना केली होती. दरम्यान, अमेरिकेने अलीकडे प्रथमच स्पष्टपणे मान्य केले आहे की, त्यांच्याकडे अंतराळ कक्षेत तैनात अशी शस्त्रे आहेत, ज्यांचा वापर शत्रूच्या कारवायांना प्रत्युत्तर देण्यासोबतच आक्रमक आणि संरक्षणात्मक अशा दोन्ही मोहिमांसाठी केला जाऊ शकतो. अमेरिका, चीन आणि रशिया यांच्यात अंतराळातील लष्करी वर्चस्वासाठी स्पर्धा तीव्र होत असताना हा खुलासा झाला आहे.
ट्रम्प यांनी एआयची तुलना पुढील औद्योगिक क्रांतीशी किंवा इंटरनेटशी केली. ही तंत्रज्ञान क्रांती अमेरिकेच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) २५ टक्क्यांपर्यंत योगदान देऊ शकते, असे त्यांनी म्हटले. आपल्या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी एआय ‘नष्ट होईल’ हा दावा डेमोक्रॅट्सकडून करण्यात येणाऱ्या ‘अनेक खोट्या दाव्यांपैकी’ एक असल्याचे म्हटले. रशिया-युक्रेन युद्ध आणि जागतिक तापमानवाढीच्या मुद्द्यांचाही त्यांनी अशाच दाव्यांच्या यादीत समावेश केला. या मुद्द्यांमुळे अमेरिकेचे ‘नुकसान’ होत असल्याचा दावाही त्यांनी केला.
मात्र, प्रस्तावित ‘एआय फोर्स’ची रचना कशी असेल किंवा ‘एआय सीझर’च्या जबाबदाऱ्या नेमक्या काय असतील, याबाबत ट्रम्प यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. वृत्तसंस्थेनुसार, अमेरिकेत एआयचा वेगाने होत असलेला विकास आणि त्यातून निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांबाबत सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode