येमेनमधील हुथी बंडखोरांची पाकिस्तान, तुर्कियेला थेट धमकी; लष्करी हस्तक्षेप केल्यास कठोर प्रत्युत्तराचा इशारा
सना, 20 सप्टेंबर (हिं.स.)।येमेनमधील हुथी बंडखोरांनी पाकिस्तान आणि तुर्कियेला थेट इशारा दिला आहे. या दोन्ही देशांनी येमेनमध्ये सौदी अरेबियासोबत मिळून कोणत्याही प्रकारचा लष्करी हस्तक्षेप केल्यास त्याला कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असे हुथींनी म्हटले आ
येमेनमधील हुथी बंडखोरांची पाकिस्तान, तुर्कियेला थेट धमकी; लष्करी हस्तक्षेप केल्यास कठोर प्रत्युत्तराचा इशारा


सना, 20 सप्टेंबर (हिं.स.)।येमेनमधील हुथी बंडखोरांनी पाकिस्तान आणि तुर्कियेला थेट इशारा दिला आहे. या दोन्ही देशांनी येमेनमध्ये सौदी अरेबियासोबत मिळून कोणत्याही प्रकारचा लष्करी हस्तक्षेप केल्यास त्याला कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असे हुथींनी म्हटले आहे. सौदी अरेबियावर हुथी बंडखोरांकडून नव्याने हल्ले सुरू असताना ही धमकी देण्यात आली आहे.

हुथी (अन्सार अल्लाह)च्या राजकीय ब्युरोचे सदस्य आणि धमारचे गव्हर्नर मोहम्मद अल-बुखैती यांनी इराकी दूरचित्रवाणी वाहिनीवरील एका कार्यक्रमात ही भूमिका मांडली. पाकिस्तान आणि तुर्किये या संघर्षात सहभागी झाल्यास त्यांच्यावर पूर्ण ताकदीने हल्ला केला जाईल आणि दोन्ही देशांना ते लक्षात राहील असा धडा शिकवला जाईल, असे त्यांनी म्हटले.

मात्र, पाकिस्तान आणि तुर्कियेतील सर्वसामान्य नागरिकांच्या मनात येमेनबद्दल मोठी सहानुभूती असल्याचेही अल-बुखैती यांनी मान्य केले. त्यांची ही धमकी दोन्ही देशांतील जनतेसाठी नसून, सौदी अरेबियाला लष्करी मदत करणाऱ्या सरकारांसाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हुथी बंडखोरांच्या या धमकीनंतर ‘मक्का संयुक्त संरक्षण करारा’ची चर्चा पुन्हा वेगाने सुरू झाली आहे. तुर्किये, पाकिस्तान आणि सौदी अरेबियाने याच वर्षी ७ ऑगस्ट रोजी या संरक्षण करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. वाढत्या प्रादेशिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सामूहिक जबाबदारी आणि सुरक्षा मजबूत करणे हा या कराराचा उद्देश आहे.करारातील तरतुदीनुसार, सदस्य देशांपैकी कोणत्याही एका देशावर झालेला हल्ला हा सर्व सदस्य देशांवरील हल्ला मानला जाईल.

दरम्यान, तुर्कियेचे परराष्ट्र मंत्री हाकान फिदान यांनी सौदी अरेबियाच्या सार्वभौमत्वावर निर्माण झालेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर एकजूट व्यक्त केली आहे. सौदी अरेबियाला लष्करी स्तरावरील सहकार्याची गरज भासू शकते, असे त्यांनी म्हटले. मक्का संयुक्त संरक्षण कराराच्या चौकटीत तुर्किये पाकिस्तानशी चर्चा करेल आणि आवश्यक तांत्रिक मदत उपलब्ध करून देऊ शकते, असेही फिदान यांनी स्पष्ट केले.मक्केजवळील तेल प्रकल्पांवर झालेल्या हल्ल्यांचा फिदान यांनी तीव्र निषेध केला आहे.

येमेनमधील हे युद्ध २०१४ पासून सुरू आहे. त्यावेळी हुथी बंडखोरांनी राजधानी सना ताब्यात घेतली होती. त्यानंतर २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त येमेन सरकारच्या समर्थनार्थ सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीने येमेनमध्ये लष्करी हस्तक्षेप केला.या वर्षी जुलैपासून हुथी बंडखोरांनी रियादविरोधात समुद्री नाकेबंदी जाहीर केली असून, लाल समुद्राच्या किनाऱ्यावर तसेच बाब अल-मंदेब सामुद्रधुनीमध्ये आपले वर्चस्व वाढल्याचा दावा केला आहे.हुथींनी सौदी अरेबियातील तेल प्रकल्पांनाही लक्ष्य केले आहे. त्यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतींबाबत चिंता वाढली आहे.

पाकिस्तानने सुरुवातीपासूनच सौदी अरेबियावरील हल्ल्यांचा विरोध केला असून, हा मुद्दा संयुक्त राष्ट्रांमध्येही उपस्थित केला आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एका खासगी दूरचित्रवाणी वाहिनीशी बोलताना सांगितले की, मक्का आणि मदिनाचे रक्षण करणे हा त्यांच्यासाठी ‘शाश्वत करार’ आणि धार्मिक कर्तव्य आहे. पवित्र स्थळांची सुरक्षा ही कोणत्याही कागदी करारापेक्षा अधिक महत्त्वाची असल्याचे त्यांनी म्हटले.

दरम्यान, पाकिस्तानी लष्कराची माध्यम शाखा असलेल्या आयएसपीआरचे महासंचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनीही सौदी अरेबियाला पाकिस्तानच्या ‘बिनशर्त’ पाठिंब्याचा पुनरुच्चार केला. सौदी अरेबिया आणि पवित्र स्थळांच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान कोणत्याही थराला जाण्यास तयार आहे आणि त्यांना कोणतेही पाऊल उचलण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असे त्यांनी म्हटले.मात्र, पाकिस्तान आणि तुर्कियेकडून करण्यात आलेल्या या दाव्यांचा प्रत्यक्ष परिणाम अद्याप जमिनीवर दिसून आलेला नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande