
नागोया (जपान), 23 सप्टेंबर (हिं.स.)आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक अंतिम फेरीत भारताची नेमबाज मनू भाकर पाचव्या स्थानावर राहिली. १८ व्या शॉट (फेरी) नंतर स्पर्धेतून बाहेर पडण्यापूर्वी तिने एकूण १८१.१ गुण मिळवले.
५७९-२०x गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहून पात्रता फेरी उत्तीर्ण करणाऱ्या २४ वर्षीय भाकरला, १८ व्या शॉटमध्ये ९.६ गुण मिळाल्यानंतर स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. पात्रता फेरीत तिची सुरुवात संथ झाली होती; तिने ९५ गुणांनी सुरुवात केली होती. पण त्यानंतर ९६, ९६ आणि ९८ अशा गुणांच्या मालिकांसह तिने दमदार पुनरागमन केले होते.
दक्षिण कोरियाच्या चू गा-उनने २४६.३ गुणांसह सुवर्णपदक जिंकले आणि आशियाई विक्रम प्रस्थापित केला, तर चीनच्या शेन यियाओने २४१.३ गुणांसह रौप्यपदक पटकावले. चीनच्याच जियांग रॅनक्सिनने २२१.६ गुणांसह कांस्यपदक मिळवले.
भाकरचे पाचवे स्थान हे भारताच्या महिला १० मीटर एअर पिस्तूल संघाने पदकाची संधी थोडक्यात गमावल्यानंतर आले. हा संघ 'इनर-१०' शॉट्सच्या फरकामुळे चौथ्या स्थानावर राहिला होता. पात्रता फेरीत ईशा सिंग ५७२ गुणांसह १६ व्या, तर सुरुची सिंग ५६८ गुणांसह २६ व्या स्थानावर राहिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे