
लातूर, 24 सप्टेंबर (हिं.स.)पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन व संरक्षण करण्यासाठी अहमदपूर तालुक्यात महसूल प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. थोडगा ल.पा. तलाव व मोघा ल.पा. तलाव येथे तलावातील पाण्याचा अनधिकृत उपसा होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महसूल विभाग, जलसंपदा विभाग, महावितरण विभाग, पोलिस विभाग व इतर विभागांच्या संयुक्त पथकाने घटनास्थळी पाहणी करून पाणीउपशासाठी वापरण्यात येणाऱ्या मोटारी, स्टार्टर आणि वायर जप्त केले आहेत.
तलावातील उपलब्ध पाणीसाठा हा परिसरातील विविध पाणी वापरासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी विभागाकडून कठोर पावले उचलण्यात येत आहेत. पाणीटंचाईच्या काळात काही व्यक्तींकडून जलाशयातील पाण्याचा अनधिकृत उपसा केल्यास उपलब्ध पाणीसाठ्यावर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे जलाशयातील पाण्याचा अनधिकृत उपसा, मोटारद्वारे पाणी उचलणे अथवा परवानगीशिवाय पाईपलाईन टाकणे यास पूर्णपणे प्रतिबंध करण्यात आला असून, अशा प्रकारच्या घटना पुन्हा आढळल्यास नियमानुसार कडक कारवाई करण्यात येणार आहे.
महसूल व जलसंपदा विभागाने सर्व नागरिक व शेतकऱ्यांना पाण्याचा काटकसरीने व नियमानुसार वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, जलाशयातील अनधिकृत पाणी उपसा निदर्शनास आल्यास तो त्वरित संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून द्यावा, असेही सांगण्यात आले आहे.
“पाणी हा सार्वजनिक मौल्यवान संसाधन असून, पाणीटंचाईच्या काळात प्रत्येक थेंबाचे जतन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे,” असे आवाहन सर्व विभागांच्या वतीने तहसीलदार उज्वला पांगरकर यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis