
अमरावती, 24 सप्टेंबर (हिं.स.)।
अमरावती विभागातील पिकांवर निर्माण झालेल्या संकटाची दखल घेत राज्य सरकारकडून दुष्काळग्रस्त भाग जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दुष्काळ संहितेतील ट्रिगर-१ नुसार दुष्काळ जाहीर करण्याचा शासन निर्णय उद्या काढण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. एखादा भाग या प्रक्रियेतून सुटला तर ट्रिगर-३ नुसार त्याचा समावेश केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अमरावती विभागातील परिस्थितीची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अमरावती विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला ते पुढे म्हणाले की, सध्या सर्वच पिकांवर संकट निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारे दिलासा देता येईल, यासाठी दौरा करण्यात आला. दुष्काळग्रस्त भागात चारा व पाणीटंचाई दूर करण्याबरोबरच अन्नधान्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी शासनाकडून उपाययोजना केल्या जातील. शेतकऱ्यांना थेट हेक्टरी मदत देण्याची कार्यवाहीही केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. ज्या भागात रब्बीची पेरणी शक्य आहे, त्या भागातील शेतकऱ्यांनाही मदत देण्याचा प्रयत्न केला जाईल. रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कामे हाती घेतली जातील. जलसंधारणाच्या कामांवर भर देत जलसाठे निर्माण करणे आणि गाळमुक्त धरणांची कामे करण्याचेही सरकारचे नियोजन असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.केंद्र सरकारकडून मदत मिळण्यास काही प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. मात्र, केंद्राच्या निधीची वाट न पाहता राज्य सरकार आपल्या स्तरावर मदत करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मदत सरसकट करण्याचा प्रयत्न असला तरी कायद्यानुसार पंचनामे करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, मोठ्या प्रमाणावर कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. वाशिम जिल्ह्यात ५२ हजारपैकी ४२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली असून उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच पैसे मिळतील.अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेने केवळ ५० टक्के पीककर्ज देण्याच्या निर्णयाबाबत फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. पात्र शेतकऱ्यांना पूर्ण कर्ज द्यावे लागेल, अशा सूचना बँकेला पत्राद्वारे देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सोयाबीन खरेदीबाबतही सरकारची तयारी असल्याचे सांगत, गरज पडल्यास संपूर्ण सोयाबीन खरेदी केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. यंदा शासकीय दरापेक्षा खासगी बाजारातील दर अधिक राहण्याची शक्यता असून सोयाबीन नोंदणीची प्रक्रिया लवकर सुरू केली जाईल. दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मदत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील आग दुर्घटनेच्या अहवालाबाबत बोलताना हा अहवाल लवकरच सार्वजनिक केला जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. अहवालातून दुर्घटनेची वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असा दावाही त्यांनी केला.
उद्धव ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर
“जे या संदर्भात बोलत आहेत, त्यांनी भूतकाळातही पाहिले पाहिजे. त्यांच्या काळात कोणते निर्णय घेतले गेले, त्याला किती वेळ लागला आणि शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मदत केली, हेही त्यांनी सांगितले पाहिजे. मागे वळून पाहिल्यास त्यांच्या लक्षात येईल की, त्यांच्या तुलनेत आम्ही अधिक चांगले काम करत आहोत.”
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी