


* गणरायाच्या विसर्जनाने सर्वत्र होणार भक्तीमय वातावरण
मुंबई, 24 सप्टेंबर (हिं.स.) - अवघ्या महाराष्ट्रासह देश-विदेशातील भक्तांच्या लाडक्या बाप्पाचे, गणरायाचे १२ दिवस मोठ्या जल्लोषात आदरातिथ्य केल्यानंतर आता तितक्याच उत्साहात गणेशोत्सवाच्या सांगतेनिमित्त लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी सर्वत्र तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. गणेश विसर्जन सोहळा सुरक्षित, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडावा, यासाठी प्रशासन, स्थानिक संस्था, गणेश मंडळे आणि स्वयंसेवक सज्ज झाले आहेत. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गांवर स्वच्छता, प्रकाशयोजना, वाहतूक नियोजन आणि सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रमुख विसर्जन घाटांवर कृत्रिम तलाव, निर्माल्य संकलन केंद्रे, वैद्यकीय पथके, अग्निशमन दल तसेच आपत्कालीन सेवांची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांच्या मदतीसाठी स्वयंसेवक आणि बचाव पथकेही तैनात करण्यात येत आहेत.
घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी अनेक ठिकाणी कृत्रिम तलाव आणि फिरते विसर्जन कुंड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पर्यावरणाचे संवर्धन लक्षात घेऊन शाडू मातीच्या मूर्ती, नैसर्गिक रंगांचा वापर आणि निर्माल्याचे स्वतंत्र संकलन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. गणेश विसर्जनावेळी गर्दीचे व्यवस्थापन, महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि प्रथमोपचार केंद्रांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. गणरायाला भावपूर्ण निरोप देताना नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूर यांसह विविध शहरांमध्ये मोठ्या उत्साहात विसर्जनाची तयारी सुरू असून, देशातील अन्य राज्यांबरोबरच परदेशातील भारतीय समुदायांमध्येही गणेश विसर्जनाची लगबग पाहायला मिळत आहे. भक्तिमय वातावरणात “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”च्या जयघोषात बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविक सज्ज झाले आहेत.
हिंदू दिनदर्शिकेनुसार, यंदा 25 सप्टेंबरच्या दिवशी अनंत चतुर्दशी आहे, या दिवशी गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. धार्मिक मान्यता आणि लोकपरंपरेनुसार, भाविक गणपती बाप्पाला निरोप देण्यापूर्वी त्यांची विधीवत पूजा करतात. त्यानंतर ते गणपतीला नैवेद्य दाखवून आरती करतात आणि मग मूर्तीचे विसर्जन करतात. काही कुटुंबांमध्ये, गणेश विसर्जन दीड दिवस, पाचव्या किंवा सातव्या दिवशी केले जाते. तर मंदिर आणि मंडपांमध्ये स्थापित गणेश मूर्तींचे विसर्जन अनंत चतुर्दशीला केले जाते.
गणेश विसर्जन (अनंत चतुर्दशी) तिथी सुरूवात - 24 सप्टेंबर 2026 रात्री 11:18 वाजता सुरू होत असून तिथी समाप्ती 25 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 11:06 वाजता होणार आहे. यंदा पंचांगानुसार, 25 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीचा दिवस मानला जातो. बाप्पाच्या विसर्जनाचे 4 शुभ मुहूर्त असून पंचांगानुसार 25 सप्टेंबर रोजी सकाळी 6:28 ते 10:59, दुपारी 12:30 ते 2:01 , सायंकाळी 5:02 ते 6:32 आणि
रात्री 9:31 ते 11:01 या कालावाधीत शुभ मुहूर्त आहेत.
एकूणच गेले १२ दिवस चांगल्या प्रकारे साजरा झालेल्या गणेशोत्सवाची सांगता देखील तितक्यात सुरक्षेत पार पडण्यासाठी सर्वच ठिकाणी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुण्यातही मानाच्या पाच गणपतींचे एका मागोमाग विसर्जन सोहळा सुरू होईल. त्या नंतर अन्य गणपतींचे विसर्जन होईल.
सर्वांत मोठ्या प्रमाणावर विसर्जन होत असलेल मुंबईत ६ सहपोलिस आयुक्त, ९ अपर पोलिस आयुक्त, ३८ पोलिस उपायुक्त (DCP), ६६ सहायक पोलिस आयुक्त (ACP), ३,२१३ पोलिस अधिकारी, १८,९४० अंमलदार आणि १,०५० प्रशिक्षणार्थी. याशिवाय ड्रोनविरोधी पथके, आरएएफ (RAF), एसआरपीएफ (SRPF), फोर्स वन, QRT, दंगा नियंत्रण पथक आणि पहिल्यांदाच वाळूच्या समुद्रकिनाऱ्यांवर गस्त घालण्यासाठी घोडेस्वार युनिट तैनात केले आहेत. नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद वस्तूबद्दल तात्काळ पोलिसांना कळवावे; आपत्कालीन मदतीसाठी 100, 112 किंवा 103 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ठाणे व कल्याण परिसर सुरक्षा तयारी
ठाणे आयुक्तालयांतर्गत विसर्जनाच्या दिवशी सुमारे ४,५०० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. कल्याण परिसरात २ DCP, ४ ACP, २५ पोलीस निरीक्षक, ८० API/PSI, ७९५ पोलीस अंमलदार, १६० होमगार्ड आणि SRPF च्या दोन प्लाटून तैनात केली आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत १९३ विसर्जन केंद्र आणि ६६ गणेशमूर्ती दान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत (जसे की मोठागाव रेतीबंदर, दुर्गाडी गणेश घाट इत्यादी). महिला सुरक्षेसाठी साध्या वेशातील आणि महिला पोलिसांची विशेष पथके नेमली आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी