
लातूर, 24 सप्टेंबर (हिं.स.)।
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर लातूर शहर महानगरपालिकेने जय्यत तयारी केली असून शहरात १६ ठिकाणी गणेशमूर्ती संकलन केंद्रे उभारण्यात आली आहेत. प्रत्येक संकलन केंद्रावर आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले असून विसर्जनाच्या दिवशी तब्बल ९०० कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. मनपा आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी बुधवारी प्रमुख विसर्जन मार्ग तसेच मूर्ती संकलन केंद्रांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
शहरातील विविध प्रभागांतील नागरिकांच्या सोयीसाठी नांदेड रस्त्यावरील यशवंत शाळा, विवेकानंद चौकातील पाण्याची टाकी, मंठाळे नगर येथील मनपा शाळा क्रमांक ९, सिद्धेश्वर मंदिर, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील शासकीय विहीर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाण्याच्या टाकीजवळ, दयानंद महाविद्यालयाचे वाहनतळ, सरस्वती कॉलनीतील पाण्याची टाकी, टाऊन हॉल, बांधकाम भवन, कव्हा रोड, साळे गल्लीतील यशवंत शाळा, साई रस्त्यावरील तिवारी यांच्या विहिरीजवळ, तावरजा कॉलनीतील गणेश नगर, काशी विश्वेश्वर ग्रीन बेल्ट आणि अंबाजोगाई रस्त्यावरील एसटी कार्यशाळेसमोरील परिसरात मूर्ती संकलन केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
प्रत्येक मूर्ती संकलन केंद्रासाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून मूर्ती वाहतुकीसाठी ४५ आयशर वाहने, ४ क्रेन आणि २ जेसीबी उपलब्ध ठेवण्यात आले आहेत. विसर्जन तलावाच्या ठिकाणी २० प्रशिक्षित पोहणारे कर्मचारी तसेच अग्निशमन विभागाचे २० प्रशिक्षित कर्मचारी वाहन व आवश्यक यंत्रणेसह तैनात राहणार आहेत.
महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक संकलन केंद्रावर घरगुती चार फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती स्वीकारल्या जाणार आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांच्या मोठ्या मूर्तींसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मंडळांनी मोठ्या मूर्ती स्वतःच्या वाहनातून १२ नंबर पाटी येथील विमानतळ रस्त्यावर आणून दिल्यास महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक यंत्रणा उपलब्ध करून विसर्जनाची व्यवस्था केली जाणार आहे.
सार्वजनिक गणेश मंडळांनी आपल्या मूर्ती १२ नंबर पाटीपर्यंत आणून महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.
या पाहणीवेळी मनपा आयुक्त राहुल कुलकर्णी आणि उपायुक्त वसुधा फड यांनी प्रमुख विसर्जन मार्ग तसेच मूर्ती संकलन केंद्रांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis