
कोल्हापूर, 24 सप्टेंबर (हिं.स.)। आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्लास्टिकच्या वस्तूंचा बेसुमार वापर करीत होत असल्याने त्यापासून होणारे दुष्परिणाम देखील सद्यस्थितीला आपण अनुभवत आहोत यासाठी मानवी आरोग्याच्या दृष्टीकोनातून पर्यावरण संवर्धनावर काम करणाऱ्या वृक्षप्रेमी संस्थेकडून 'प्लास्टिक कप मुक्त चहा गाडी' अभियान राबवण्यात आले.
साने गुरुजी येथील च्याव म्याव ग्रुप येथे गणेश भक्तांना प्लास्टिकचे दुष्परिणाम यावर प्रबोधन करून या अभियानास प्रारंभ करण्यात आला या उपक्रमामध्ये नगरसेवक शारंगधर देशमुख, डॉ. संदीप पाटील, जयेश ओसवाल(अरिहंत जैन फाउंडेशन) वृक्षप्रेमी संस्थेचे अध्यक्ष अमोल बुढढे, यांनी पुढाकार घेतला.
चहा हे आता सर्वांसाठीच लोकप्रिय असे पेय मानले जाते. यातूनच कोल्हापूर शहरांमध्ये असंख्य चहाच्या टपरी-स्टॉल्स आहेत जेथे लोक चहा पिण्यासाठी दररोज गर्दी करतात. पूर्वी चहा पिण्यासाठी चिनी मातीचे,काचेचे, स्टीलचे कप सर्रास वापरात असायचे परंतु लॉकडाऊन काळानंतर जेव्हा व्यवसाय सुरू झाले तेव्हा कोरोना आजाराच्या भीतीमुळे प्लास्टिक आणि कागदी कपचा सर्रास, बेसुमार वापर सुरू झाला आहे. सध्या मात्र या आजाराची कसलीही परिस्थिती नसताना देखील युज अँड थ्रो कप वापराची जणू सवयच सर्व दुकान धारकांना आणि ग्राहकांना देखील लागली आहे. यातून लाखो प्लास्टिक आणि कागदी कपांची दैनंदिन कचऱ्यामध्ये भर होत आहे याचा ताण स्थानिक प्रशासनावर स्वाभाविकच पडत आहे. यावर प्रशासनाने काहीतरी पावले उचलावीत यासाठी ही परिस्थिती बदलण्यासाठी वृक्ष प्रेमी संस्थेकडून प्लास्टिक कप मधून चहा पिणे म्हणजे कॅन्सरला निमंत्रण आहे यावर सर्वत्र प्रबोधन सुरू आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून प्लास्टिक/कागदी कपचा वापर बंद होण्यासाठी प्रोत्साहन भावनेतून शहरातील किमान 200 चहा गाडी चालकांना प्रत्येकी 2 डझन स्टीलचे कप भेटवस्तू म्हणून देण्यात येणार आहेत. आणि यांना प्लास्टिक कप मुक्त चहा गाडी अभियानामध्ये समाविष्ट करून घेणार असल्याचे संयोजकांकडून सांगण्यात आले.
या उपक्रमामध्ये योगेश पावले, विशाल जोशी ओम कुरणे, सनी पाटील, महादेव मोरे, भालचंद्र गोखले, राजेंद्र माळवी, अक्षय कांबळे, अरुण पोतदार, शैलेश पोवार, सचिन पोवार, पूजा भोसले, रंजना आडके, आदीं वृक्ष प्रेमी संस्थेचे सदस्य सहभागी झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar