
तीन दिवसीय संपापूर्वी ग्राहकांना आवश्यक व्यवहार पूर्ण करण्याचा बँकांचा सल्ला
नवी दिल्ली, 26 सप्टेंबर (हिं.स.)। सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांनी २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान पुकारलेल्या तीन दिवसीय देशव्यापी संपामुळे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ग्राहकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बँकांनी ग्राहकांना संपापूर्वी आवश्यक बँकिंगची कामे उरकून घेण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून त्यांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (यूएफबीयू)ने २८ सप्टेंबरपासून तीन दिवसीय देशव्यापी संपाचे आवाहन केले आहे. त्यापूर्वी २६ सप्टेंबर रोजी महिन्याचा चौथा शनिवार असल्याने आज बँका बंद राहतील. मात्र, २७ सप्टेंबर रोजी रविवारची सुट्टी असूनही बँका सुरू राहणार आहेत. त्यामुळे २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान सलग तीन दिवस बँक शाखांमधील कामकाज प्रभावित राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)सह काही जुन्या खासगी बँकांनी ग्राहकांना संपापूर्वीच आवश्यक बँकिंगची कामे पूर्ण करण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून त्यांना त्रास होऊ नये. एसबीआयने पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे की, एसबीआयच्या शाखा २७ सप्टेंबर रोजी सुरू राहतील. आपल्या बँकिंगच्या गरजांसाठी कोणत्याही शाखेला भेट द्या.
उल्लेखनीय आहे की, बँक युनियनच्या वतीने पाच दिवसांचा (बँकिंग वर्किंग) कामकाजाचा आठवडा लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी संपाचे आवाहन करण्यात आले आहे. बँकांच्या तीन दिवसांच्या संपादरम्यान बँक शाखांमध्ये रोख रक्कम जमा करणे- काढणे, धनादेश क्लिअरन्स आणि इतर सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. ज्या ग्राहकांना शाखेत जाऊन बँकिंगशी संबंधित कामे करायची आहेत, त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule