
रायगड, 26 सप्टेंबर (हिं.स.)। माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोर्बा परिसरातील बौर्ले बौद्धवाडी येथून अज्ञात चोरट्याने दोन गावठी बैल आणि दोन गायी चोरून नेल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या प्रकरणी माणगाव पोलिसांनी अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मौजे नंदनवण हॉटेलजवळील भैरी बोरजाई गावदेवी मंदिर परिसर, बौर्ले बौद्धवाडी (पो. मोर्बा, ता. माणगाव) येथे फिर्यादी व साक्षीदार यांच्या राहत्या घराच्या आवारात पाळीव जनावरे बांधलेली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्याने मालकाच्या नकळत आणि संमतीशिवाय स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गोठ्यातून दोन गावठी बैल आणि दोन गायी लंपास केल्या. चोरीस गेलेल्या या चारही जनावरांची एकूण अंदाजे किंमत सुमारे १ लाख ८५ हजार रुपये इतकी आहे.
सकाळच्या सुमारास जनावरे बांधलेल्या जागेवर न दिसल्याने परिसरात शोध घेण्यात आला; मात्र कुठेही थांगपत्ता न लागल्याने चोरी झाल्याची खात्री पटली. त्यानंतर पीडित मालकाने थेट माणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
या तक्रारीच्या आधारे माणगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) २०२३ चे कलम ३०३(२) नुसार गुन्हा रजिस्टर नंबर २७८/२०२६ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. एकाच वेळी चार जनावरांची चोरी झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये व पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक (पोसई) जाधव करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)