
रायगड, 26 सप्टेंबर (हिं.स.)।
गेल्या अनेक वर्षांपासून पोलादपूर तालुक्यात विविध क्रीडा स्पर्धांच्या आयोजनावेळी क्रीडांगणाची मोठी समस्या भेडसावत आहे. ही अडचण दूर करण्यासाठी रानबाजिरे धरणाजवळील ७ एकर शासकीय जागेवर सुसज्ज क्रीडांगण आणि हेलिपॅड उभारण्यात येईल, अशी ग्वाही रायगड जिल्हा परिषदेचे अर्थ, शिक्षण व क्रीडा सभापती चंद्रकांत कळंबे यांनी दिली. ब्रह्मध्वजा अकॅडमी दिविल येथे आयोजित तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
तहसीलदार यांनी या जागेच्या तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यास, मंत्री उदय सामंत व पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या सहकार्यातून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपण घेऊ, असा विश्वास सभापती कळंबे यांनी व्यक्त केला. यापूर्वी या जागेवर विविध उपक्रमांची केवळ चर्चा झाली होती; मात्र आता प्रत्यक्ष क्रीडांगण व हेलिपॅडचा मार्ग मोकळा होताना दिसत आहे.
या उद्घाटन सोहळ्यास पंचायत समिती उपसभापती अनिता भिलारे, तहसीलदार कपिल घोरपडे, गटविकास अधिकारी दिप्ती गाट, गटशिक्षणाधिकारी विजय कानेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामीण भागातील शिक्षणावर बोलताना सभापतींनी चिंता व्यक्त केली. वाढत्या स्थलांतरामुळे शाळांमधील पटसंख्या घटून शाळा बंद पडणे ही शोकांतिका असल्याचे नमूद करत, पटसंख्या टिकवण्यासाठी 'सेमी इंग्रजी' माध्यम सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. तसेच जिल्ह्यातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या ३ हजारांवर नेण्याचे आवाहन शिक्षकांना केले.
तहसीलदार कपिल घोरपडे यांनी, शिक्षक हा विद्यार्थ्यांसाठी देवाने पाठवलेला दूत असतो, अशा भावना व्यक्त करत खेळाडूंना शिस्त, नियमित व्यायाम आणि अभ्यासाचे नियोजन करण्याचा मोलाचा सल्ला दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)