दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये रायगडमधून केवळ एकाच तालुक्याची निवड
रायगड, 26 सप्टेंबर (हिं.स.)। राज्य सरकारने जाहीर केलेल्या राज्यातील २६५ दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत रायगड जिल्ह्यातील केवळ श्रीवर्धन तालुक्याचा समावेश झाल्याने उर्वरित तालुक्यांतील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. कोकणातील १२ तालुके दु
265 talukas in the state are drought-affected; however, only one taluka from Raigad has been selected.


रायगड, 26 सप्टेंबर (हिं.स.)।

राज्य सरकारने जाहीर केलेल्या राज्यातील २६५ दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत रायगड जिल्ह्यातील केवळ श्रीवर्धन तालुक्याचा समावेश झाल्याने उर्वरित तालुक्यांतील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. कोकणातील १२ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले असले तरी, रायगडमधील इतर नुकसानग्रस्त तालुक्यांना वगळण्यात आल्यामुळे शासनाच्या धोरणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कोकणात सरासरी पाऊस अधिक असला तरी वादळी वारे, लहरी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे दरवर्षी शेतीसह घरांचे प्रचंड नुकसान होते. गतवर्षीच्या नुकसानीचे पंचनामे होऊनही अनेक शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळालेली नाही. अशा स्थितीत यंदाही मोठे नुकसान सोसावे लागलेल्या बळीराजाला दुष्काळी मदतीची आशा होती; मात्र केवळ श्रीवर्धनचा समावेश करून शासनाने उर्वरित रायगड जिल्ह्याकडे दुर्लक्ष केल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात एकाही तालुक्याचा समावेश झालेला नाही, तर रायगडमधून केवळ एकच तालुका निवडल्याने कोकणातील नैसर्गिक आपत्तीचे निकष नक्की काय, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.

कोकणातील शेतीचे भौगोलिक स्वरूप आणि आपत्तीचे निकष वेगळे असताना, शासनाने दुष्काळ जाहीर करण्यासाठी नेमकी कोणती पद्धत वापरली याचा खुलासा करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. केवळ एका तालुक्यापुरती मदत मर्यादित न ठेवता संपूर्ण रायगड जिल्ह्यातील नुकसानीचा स्वतंत्रपणे आढावा घेऊन सर्व बाधित शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी या अन्यायाविरोधात आवाज उठवावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande