रेनॉ डस्टरचे हायब्रिड मॉडेल १७ ऑक्टोबरला होणार लॉन्च
मुंबई, 27 सप्टेंबर (हिं.स.)। कार निर्माता कंपनी रेनॉ इंडिया आपल्या लोकप्रिय डस्टर एसयूव्हीचे हायब्रिड मॉडेल भारतीय बाजारात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. नवीन रेनॉ डस्टर ई-टेक १६० हे हायब्रिड मॉडेल येत्या १७ ऑक्टोबरला भारतीय बाजारात दाखल होणार असून,
Duster hybrid model to be launched  Oct 17


मुंबई, 27 सप्टेंबर (हिं.स.)। कार निर्माता कंपनी रेनॉ इंडिया आपल्या लोकप्रिय डस्टर एसयूव्हीचे हायब्रिड मॉडेल भारतीय बाजारात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. नवीन रेनॉ डस्टर ई-टेक १६० हे हायब्रिड मॉडेल येत्या १७ ऑक्टोबरला भारतीय बाजारात दाखल होणार असून, डस्टरच्या विद्यमान १.०-लिटर आणि १.३-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन पर्यायांसोबत हा तिसरा पॉवरट्रेन पर्याय ठरणार आहे. हायब्रिड मॉडेलच्या माध्यमातून कंपनीचे लक्ष विशेषतः शहरांमधील ग्राहकांकडे असल्याचे दिसून येत आहे.

रेनॉ इंडियाचे उपाध्यक्ष फ्रान्सिस्को हिडाल्गो यांनी यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार, डस्टरच्या हायब्रिड पॉवरट्रेनला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, यावर्षीची उपलब्ध वाहने आधीच बुक झाली असून, वाढती मागणी लक्षात घेऊन उत्पादन क्षमता वाढवण्याचे काम सुरू आहे. मेट्रो शहरांमध्ये झालेल्या एकूण डस्टर बुकिंगपैकी सुमारे ३९ टक्के बुकिंग हायब्रिड व्हेरिएंटसाठी झाल्याचे कंपनीने सांगितले आहे.

नवीन डस्टर हायब्रिडमध्ये १.८-लिटर जीडीआय पेट्रोल इंजिनसोबत १.४ किलोवॅट-तास क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. या संपूर्ण हायब्रिड प्रणालीतून १५८ बीएचपीची कमाल पॉवर आणि १७२ एनएम टॉर्क मिळतो. यासोबत ८-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि दोन इलेक्ट्रिक मोटर्स देण्यात आल्या आहेत. रेनॉच्या दाव्यानुसार, डस्टर हायब्रिडची एकूण ड्रायव्हिंग रेंज तब्बल १,००० किलोमीटरपर्यंत असू शकते.

शहरातील दैनंदिन वापरादरम्यान ही एसयूव्ही तब्बल ८० टक्के वेळ पूर्णपणे इलेक्ट्रिक मोडमध्ये धावू शकते, असा कंपनीचा दावा आहे. त्यामुळे केवळ पेट्रोल इंजिनवर चालणाऱ्या वाहनाच्या तुलनेत इंधनाचा वापर ४० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो.

हायब्रिड प्रणालीमध्ये मल्टीमोड गिअरबॉक्सच्या मदतीने विविध ड्रायव्हिंग मोड उपलब्ध होतात. डायनॅमिक हायब्रिड मोडमध्ये पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटर एकत्रितपणे चाके चालवतात. इलेक्ट्रिक मोशन मोडमध्ये इलेक्ट्रिक मोटर चाके चालवते, तर पेट्रोल इंजिन बॅटरी चार्ज करण्याचे काम करते. याशिवाय केवळ पेट्रोल इंजिनवर वाहन चालवणारा आयसीई मोड आणि ब्रेकिंगदरम्यान ऊर्जा पुन्हा बॅटरीमध्ये साठवणारा एनर्जी रिकव्हरी मोडही मिळतो.

डिझेल इंजिनचा पर्याय नसल्याची उणीव हायब्रिड पॉवरट्रेनमुळे काही प्रमाणात भरून निघण्याची शक्यता आहे. लॉन्चनंतर रेनॉ डस्टर हायब्रिडचा सामना मारुती ग्रँड विटारा, मारुती व्हिक्टोरिस आणि टोयोटा अर्बन क्रूझर हायडर यांसारख्या स्ट्रॉंग हायब्रिड एसयूव्हींशी होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande