रायगड - ३५ जुगारी पोलिसांच्या जाळ्यात; लोहारे गावच्या हद्दीत १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
रायगड, 27 सप्टेंबर (हिं.स.)। रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात बेकायदेशीर धंद्यांविरोधात पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. पोलादपूर नजीकच्या लोहारे गावच्या हद्दीत छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या एका मोठ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी अचानक छापा टाकल
35 gamblers caught in police net! Property worth ₹12 lakh seized within Lohare village limits.


रायगड, 27 सप्टेंबर (हिं.स.)।

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात बेकायदेशीर धंद्यांविरोधात पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. पोलादपूर नजीकच्या लोहारे गावच्या हद्दीत छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या एका मोठ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी अचानक छापा टाकला. या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल ३५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, घटनास्थळावरून वाहने, मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध धंदे चालवणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लोहारे गावच्या हद्दीतील एका निर्जन ठिकाणी कायद्याची बंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर जुगाराचा खेळ सुरू असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने सापळा रचून सदर अड्ड्यावर अचानक धाड टाकली. पोलिसांना पाहताच जुगार खेळणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आणि काहींनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी घेराव घालून अनेकांना जागीच ताब्यात घेतले.

तपासादरम्यान घटनास्थळावरून जुगार खेळण्यासाठी वापरण्यात येणारे विशेष कॉईन्स, संशयितांचे महागडे मोबाईल फोन आणि त्यांनी येण्या-जाण्यासाठी वापरलेली वाहने असा एकूण सुमारे १२ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. बंदी असतानाही छुप्या पद्धतीने जुगार चालवणे आणि खेळणे याप्रकरणी ३५ जणांविरोधात जुगार प्रतिबंधक अधिनियमातील तरतुदींनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी अशा बेकायदेशीर कृत्यांवर यापुढेही कडक कारवाई सुरूच राहील, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. या धाडसी कारवाईचे स्थानिक नागरिकांकडून स्वागत होत असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande