
तेहरान, 27 सप्टेंबर (हिं.स.)।अमेरिका आणि इस्रायलच्या भीषण हल्ल्यांदरम्यान इराणचे नवे सर्वोच्च नेते अयातुल्ला मोजतबा खामेनेई यांच्याबाबत इराणी नेते मोहसेन हैदरी यांनी कतारच्या दूरचित्रवाणी नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, ज्या रुग्णालयात मोजतबा खामेनेई यांच्यावर उपचार सुरू होते, त्या रुग्णालयावर अमेरिकेने केलेल्या बॉम्बहल्ल्यानंतर त्यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले होते.
वृत्तानुसार, जखमी असतानाही मोजतबा खामेनेई यांची इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्यापदी निवड करण्यात आली होती. मात्र, गुप्त पद्धतीने झालेल्या या निवड प्रक्रियेबाबत आणि हल्ल्यांदरम्यान त्यांच्या प्रकृतीबाबत जगभरात अद्यापही विविध चर्चा सुरू आहेत.मोहसेन हैदरी यांनी सांगितले की, जखमी झाल्यानंतर मोजतबा खामेनेई यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तेहरानमधील तीन रुग्णालयांवर बॉम्बहल्ले करण्यात आले. मोजतबा खामेनेई तिसऱ्या रुग्णालयात उपचार घेत होते आणि त्यांना तेथील ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले.
अमेरिकेच्या गुप्तचर अहवालांनुसार, या हल्ल्यांमध्ये मोजतबा खामेनेई यांच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत विविध प्रकारच्या चर्चा आणि अंदाज व्यक्त केले जात आहेत.वृत्तानुसार, ८ मार्च रोजी मोजतबा खामेनेई यांची इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्यापदी निवड करण्यात आली. हैदरी यांनी सांगितले की, सरकारी दूरचित्रवाणीवर या निवडीची घोषणा होईपर्यंत स्वतः मोजतबा यांनाही त्यांच्या निवडीची माहिती नव्हती.
सर्वोच्च नेत्याची निवड करणाऱ्या ‘तज्ज्ञांची सभा’ म्हणजेच ‘असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स’लाही या हल्ल्यांमध्ये लक्ष्य करण्यात आले होते. वृत्तानुसार, कोम येथील या सभेच्या सचिवालयावर झालेल्या बॉम्बहल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला आणि निवड प्रक्रियेशी संबंधित कागदपत्रे नष्ट झाली.
हैदरी यांनी सांगितले की, सदस्यांनी गुप्त कक्षात जाण्यापूर्वी कागदावर आपली मते नोंदवली होती. मोजतबा खामेनेई यांचे नाव सर्वप्रथम त्यांनीच सुचवले होते.मोहसेन हैदरी म्हणाले, “शत्रूची भूमिका आणि त्यांचा हेतू लक्षात घेता, अयातुल्ला मोजतबा खामेनेई यांच्याशिवाय दुसरा कोणताही सर्वोच्च मार्गदर्शक असू शकत नाही. ते निरोगी आहेत, त्यांच्याकडे धार्मिक पात्रता आहे आणि देश चालवण्याची क्षमता आहे.”
मोहसेन हैदरी यांनी मोजतबा खामेनेई यांचे वर्णन ‘अंधारातील व्यक्ती’ असे केले. सर्वोच्च नेता होण्यापूर्वी त्यांनी कोणतेही औपचारिक राजकीय पद भूषवले नव्हते. मात्र, ते आपल्या वडिलांचे प्रमुख सल्लागार म्हणून कार्यरत होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode