
मुंबई, 29 सप्टेंबर, (हिं.स.)। उदयोन्मुख बाजारपेठांमधील एफएमसीजी (FMCG) क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडला (GCPL), 190 वर्षे जुन्या बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीतर्फे आयोजित 'बॉम्बे चेंबर इन्क्लुजन अवॉर्ड्स 2026' मध्ये विविधता, समानता, सर्वसमावेशकता आणि आपलेपणा (DEIB) या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी 'मार्की बेस्ट ऑफ द बेस्ट अवॉर्ड'ने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच, 'कंझ्युमर अँड लाइफ सायन्सेस' क्षेत्रात कंपनीला 'फर्स्ट रनर-अप'चा मानही मिळाला आहे.
आपल्या कर्मचारीवर्गासाठी समान संधी निर्माण करण्यावर आणि अधिक भक्कम प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यावर जीसीपीएलचा दृष्टिकोन केंद्रित आहे. आरंभ (Aarambh), गोल (GOAL) आणि बेर्सियाप (Bersiap) यांसारखे उपक्रम तसेच सर्वसमावेशक भरती प्रक्रिया यांच्यामुळे उत्पादन, विक्री आणि कॉर्पोरेट विभागांमध्ये अधिक वैविध्यपूर्ण प्रतिनिधित्व असलेली टीम तयार होण्यास मदत झाली आहे, ज्यामुळे विविध पार्श्वभूमी असलेल्या गुणवान कर्मचाऱ्यांना संस्थेमध्ये प्रगती करण्याची संधी मिळाली आहे.
या सन्मानावर भाष्य करताना, गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL) चे ग्लोबल एचआर हेड, वैभव राम म्हणाले, “आम्हाला मार्की श्रेणीमध्ये स्थान मिळाल्याचा आनंद आहे. या श्रेणीमध्ये अशा संस्थांचा समावेश होतो, ज्या सर्वसमावेशकता आणि आपलेपणासाठी एक आदर्श निर्माण करतात आणि कॉर्पोरेट जगतासाठी पुढील वाटचाल निश्चित करतात. जागतिक स्तरावर आमच्या ग्राहक वर्गामध्ये ऐतिहासिकदृष्ट्या वंचित गटांचा वाटा निम्म्याहून अधिक आहे, आम्हाला आमच्या कर्मचारी वर्गातही असेच प्रतिनिधित्व टिकवून ठेवण्याचा अभिमान आहे. GCPL मधील आमचा प्रवास अर्थपूर्ण ठरतो, कारण आमचे नेते विविध समुदायांमधील सुप्त क्षमतेला सहकारी, प्रतिभावान व्यक्ती आणि ग्राहक म्हणून संपूर्णपणे ओळखतात. या दृष्टिकोनांना एकत्रित केल्याने आमच्या कामात अधिक बुद्धी, भावना आणि कृती यांचा वापर होतो, ज्यामुळे आम्ही आमचा व्यवसाय आणि संस्कृती कशी घडवतो यात सर्वसमावेशकता रुजते.”
गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्सच्या एव्हीपी - डीईआय, कल्चर अँड एंगेजमेंट, संध्या रमेश पुढे म्हणाल्या, जीसीपीएल अंतर्गत आणि संपूर्ण इकोसिस्टममध्ये समावेशकता वाढवण्याच्या मार्गावर सातत्याने वाटचाल करत आहे. आमच्या जागतिक कर्मचारी वर्गात 50% पेक्षा जास्त प्रतिनिधित्व असल्याने, विक्री आणि उत्पादन यासारख्या कार्यांमध्ये ऐतिहासिकदृष्ट्या वगळलेल्या समुदायांचे प्रतिनिधित्व करणारे शाश्वत टॅलेंट मॉडेल तयार करताना, अंतिम ग्राहकांच्या अनुभवावर सकारात्मक परिणाम घडवण्यासाठी आमचे प्रयत्न वाढवणे हे आता आमचे ध्येय आहे. आमच्या कार्यामुळे संस्थांच्या मोठ्या समूहांना डीईआयच्या दिशेने पाऊल उचलण्यासाठी प्रेरणा मिळावी आणि हे करणे पूर्णपणे शक्य आहे यावर त्यांचा विश्वास बसावा, अशी आमची इच्छा आहे.
जीसीपीएलचे सर्वसमावेशकतेचे प्रयत्न केवळ कर्मचाऱ्यांपुरते मर्यादित नसून, वितरक, पुरवठादार, नियुक्ती भागीदार, स्वयंसेवी संस्था आणि सामुदायिक संघटनांसोबतच्या भागीदारीद्वारे त्यांच्या व्यापक व्यावसायिक परिसंस्थेपर्यंत विस्तारलेले आहेत. तसेच, ते उत्पादन नवोन्मेषापर्यंतही पोहोचतात, ज्यात त्यांच्या इन्क्लुझिव्ह ऑलफॅक्टरी पॅनेलचा समावेश आहे, जे उत्पादने कशी विकसित केली जातात याबाबत वेगवेगळे दृष्टिकोन मांडते.
संपूर्ण भारत, इंडोनेशिया, अमेरिका आणि जीएएमसीमध्ये, स्थानिक संदर्भानुसार तयार केलेल्या पद्धतींद्वारे जीसीपीएल हा दृष्टिकोन अधिक दृढ करत आहे. संस्थेच्या संस्कृतीत आणि विकासाच्या प्रवासात सर्वसमावेशकता रुजवण्यासाठी ही मान्यता कर्मचारी, नेते, सहयोगी आणि भागीदारांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नांचे प्रतीक आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर