
जळगाव, 29 सप्टेंबर, (हिं.स.)| सोने आणि चांदी खरेदीचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झालीय. जळगावच्या सराफा बाजारात २९ सप्टेंबर रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव तोळ्यामागे १३५० रुपयांनी कमी झाला आहे. दुसरीकडे चांदीच्या दरात २०६० रुपयांची घट झाली. सध्या सुरू असलेल्या पितृपक्षाच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे दर कमी झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, अमेरिकेतील व्याजदरासंदर्भातील अपेक्षा आणि कच्च्या तेलाच्या किमती यांसह विविध घटकांचा परिणाम मौल्यवान धातूंच्या दरावर होत असल्याचे बाजारातील जाणकारांकडून सांगितले जात आहे जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी दिवसभरात ३०९० रुपयांची घट झाल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १५२,९५५ रुपयांपर्यंत खाली आले होते. मंगळवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर आणखी १३५४ रुपयांची घट झाल्याने सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५१,९१० रुपयांपर्यंत घसरले. सोन्यात गेल्या तीन दिवसांच्या कालावधीत ५१६५ रुपयांची घसरण झाल्याची नोंद घेण्यात आली.
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी दिवसभरात ७२१० रुपयांची घट झाल्याने चांदी तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो २,३२,७८० रुपयांपर्यंत खाली आली होती. मंगळवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर आणखी २०६० रुपयांची घट झाल्याने चांदी जीएसटीसह प्रति किलो २,३०,७२० रुपयांपर्यंत घसरली. चांदीत गेल्या तीन दिवसांच्या कालावधीत तब्बल ११,३३० रुपयांची घसरण झाल्याची नोंद घेण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर