
परभणी, 29 सप्टेंबर (हिं.स.)। सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर या थेट विविध गावामध्ये जावून भेटी देत आहेत. त्यामुळे सेवा संकल्प अभियानातून गावोगावी जनजागृतीला वेग येत असून, त्यांची गावपातळीवरील उपस्थिती, नागरिकांशी संवाद आणि विविध शासकीय सेवा-सुविधांची प्रभावी अंमलबजावणीवर त्या भर देण्यात येत आहेत.
यावेळी गट विकास अधिकारी अक्षय सुक्रे, सहायक गट विकास अधिकारी जयराम मोडके, गटशिक्षण अधिकारी राठोड, विस्तार अधिकारी सुरेवाड, ग्रामपंचायत पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम व आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते. गंगाखेड तालुक्यात मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह मालेवाडी, राणीसावरगाव व गौळवाडी ग्रामपंचायतींना भेट दिली. यावेळी त्यांनी शाळा, अंगणवाडी व ग्रामपंचायत इमारतींची पाहणी करून आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिल्या. विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधत त्यांच्या अडचणी व शैक्षणिक सुविधांची माहिती घेतली. तसेच ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाहीच्या सूचना दिल्या. सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्ह्यातील जिंतूर, सोनपेठ, पाथरी, परभणी व इतर तालुक्यांतील विविध शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा, योगासने, विकसित भारत विषयक चित्रकला स्पर्धा आदी उपक्रम घेण्यात आले. किशनरावजी चव्हाण प्राथमिक शाळा जिंतूर येथे विद्यार्थ्यांनी योगासने व चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतला. जिल्हा परिषद पोहंडूळ येथे वर्ग सहावी ते आठवी तसेच प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परळगव्हाण, अंगलगाव, जिल्हा परिषद प्रशाला सोनपेठ, ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय जिंतूर तसेच इतर शाळांमध्येही चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. हजरत बिलाल उर्दू प्राथमिक शाळा, पाथरी येथे ‘विकसित भारत’ चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. केंद्र सिंगणापूर येथील विद्यार्थ्यांनीही अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पाथरी तालुक्यातील हदगाव येथे बालक स्वागत मेळावा व पोषण आहार प्रदर्शन आयोजित करण्यात आले. ग्रामपंचायत सुरळवाडी येथे आयुष्मान भारत ई-केवायसी शिबिर घेण्यात आले. कॉम्प्युटर ऑपरेटर व आशा सेविकांच्या माध्यमातून नागरिकांना ई-केवायसीसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. शिबिरात १५ हून अधिक नागरिकांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.सेवा संकल्प अभियानांतर्गत माहिती अधिकार दिन, रस्ता सुरक्षा जनजागृती आणि सायबर सुरक्षा जनजागृती असे उपक्रमही राबविण्यात आले. जिल्हा परिषद प्रशाला कौसडी येथे रस्ता सुरक्षा व सायबर सुरक्षा विषयक जनजागृती करण्यात आली. सेवा संकल्प अभियानांतर्गंत इटोली येथेही विविध उपक्रम घेण्यात आले. प्राथमिक शाळा पुंगळा व वरूड (नृ.) येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. जिंतूर येथील न्यू इरा इंग्लिश स्कूल येथेही अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणारे उपक्रम राबविण्यात आले. सेवा संकल्प अभियानामुळे प्रशासन, शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायती आणि नागरिक यांच्यातील समन्वय अधिक दृढ होत असून, विविध शासकीय सेवा व जनजागृतीपर उपक्रमांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis