
परभणी, 29 सप्टेंबर, (हिं.स.) दसरा-दिवाळी सारख्या महत्वपूर्ण सणांच्या काळात शहरवासीयांना सर्वतोपरि सुविधा तात्काळ पुरवाव्यात, अन्यथा महापालिका कार्यालयास टाळे ठोकले जाईल, असा इशारा भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांनी महापौरांसह आयुक्तांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.येत्या दीड-दोन महिन्यात दसरा, दिवाळी यांसारखे मोठे सण आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रभागात दहा-दहा कंत्राटी कर्मचारी तात्काळ नियुक्त करणे गरजेचे आहे. त्याचे कारण दुर्गा महोत्सव नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मोकळी मैदाने, जागांची स्वच्छता, सर्व नाल्यांची साफसफाई, मलबा व केरकचरा उचलण्याकरीता नेमलेल्या एजन्सीधारकाद्वारे तत्परतेने कारवाई अपेक्षित आहे. तसेच डेंग्यूची साथ पसरू नये या दृष्टीने तात्काळ नाल्यांची फवारणी, धूर फवारणी व अन्य कामे या कंत्राटी कामगारांद्वारे तत्परतेने करणे गरजेचे आहे. सणा सुदीच्या या काळात सर्व महिला मोठ्या प्रमाणावर विविध देवींच्या मंदिरात पहाटेपासून सायंकाळी उशीरापर्यंत गर्दी करीत आले आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रभागात ठिकठिकाणी पथदिवे पूर्णतः कार्यान्वित राहणेही गरजेचे आहे. नवीन स्ट्रीट लाईट काही भागात उभारणे आवश्यक आहे. या संदर्भातमहापालिका प्रशासनाने 1 ऑक्टोंबरपूर्वीपर्यंत कारवाई पूर्ण करावी, अन्यथा 1 ऑक्टोंबर रोजी महापालिका कार्यालयास सर्व विरोधी पक्षातील सदस्य टाळे ठोकून गांधीगिरी करतील, असा इशारा भारतीय जनता पार्टीच्या या सदस्यांनी दिला आहे. या निवेदनावर रितेश झांबड जैन, सपना व्यंकटेश जुकटे, सौ. गिरीजा शंकर आजेगांवकर, सौ. निर्मला बालासाहेब वाघमारे, सौ. सुशिला शिवाजी थोरात, गणेश टाक, सौ. वैशाली दत्तात्रय दैठणकर यांच्यासह डॉ. केदार खटींग, विश्वजित बुधवंत यांच्या स्वाक्षर्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis