
परभणी, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। शहरासह तालुक्यात विक्री होणा-या बाटलीबंद पाण्यासह 20 लिटर क्षमतेच्या पाण्याच्या जारची गुणवत्ता, स्वच्छता आणि कायदेशीर अनुपालन तपासण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात प्रांताध्यक्ष डॉ. विलास मोरे यांनी जिल्हाधिकारी तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या परभणी येथील सहायक आयुक्त (अन्न) यांना निवेदन दिले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या विषयाची दखल घेऊन सेलू तालुक्यात विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सेलू शहर व तालुक्यात विविध उत्पादक आणि विक्रेत्यांकडून बाटलीबंद पाणी तसेच 20 लिटर क्षमतेचे जार विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या पाण्याची गुणवत्ता, शुद्धीकरण प्रक्रिया, जारची स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि योग्य साठवणूक यांची नियमित तपासणी होणे आवश्यक असल्याचे ग्राहक पंचायतीने म्हटले आहे.
संबंधित उत्पादक व विक्रेत्यांकडे वैध अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाचा (एफएसएसएआय) परवाना किंवा नोंदणी आहे का, याची पडताळणी करावी. विक्रीसाठी उपलब्ध पाण्याचे नमुने घेऊन मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासणी करावी. तसेच पाण्याच्या स्रोतापासून शुद्धीकरण, पॅकिंग आणि वितरणापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. पुनर्वापरासाठी वापरण्यात येणार्या 20 लिटर क्षमतेच्या जारची स्वच्छता, निर्जंतुकीकरण व साठवणुकीची पद्धत तपासावी. तसेच बाटली व जारवरील लेबल, एफएसएसएआय क्रमांक आणि इतर आवश्यक माहितीचीही पडताळणी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis