
परभणी, 30 सप्टेंबर, (हिं.स.) - जिल्ह्यात अन्न सुरक्षा व मानके अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना सुरक्षित व गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिले. ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठकीत बोलत होते.
बैठकीस महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे, शिक्षणाधिकारी श्रद्धा जिंजूरके, डॉ. सविता बिरगे, अखिल भारतीय ग्राहक संरक्षण परिषदेचे डॉ. विलास मोरे व सोपान टोले, जिल्हा उद्योग अधिकारी नरसिंह जावळीकर, आरोग्य अधिकारी डॉ. आर. एस. महाजन, जिल्हा कृषी उपसंचालक एस. एम. जाधवर तसेच अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त अनंतकुमार चौधरी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्ह्यातील अन्न आस्थापनांची संख्या, तपासण्या, तपासणीनंतर करण्यात आलेली कारवाई तसेच १ एप्रिलपासून आजपर्यंत अन्न नमुन्यांबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला.
अन्न व औषध प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या अन्न आस्थापनांच्या तपासण्या, दंडात्मक कारवाई, जप्ती व धाडीची प्रकरणे याबाबतची माहिती बैठकीत सादर करण्यात आली. तसेच दूध भेसळीविरोधात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत घेण्यात आलेले दूध व दुग्धजन्य पदार्थांचे नमुने आणि खाद्यतेलाच्या नमुन्यांवर करण्यात आलेल्या कार्यवाहीचीही माहिती घेण्यात आली. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड होणार नाही, याची दक्षता घेऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर नियमानुसार कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. अन्न सुरक्षा व मानके अधिनियम -२००६ ची काटेकोर अंमलबजावणी करून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis