क्वेटाला जात असलेल्या फुटबॉल संघाची शस्त्रधाऱ्यांकडून लूट; सुरक्षा इशाऱ्याकडे दुर्लक्ष महागात
इस्लामाबाद, 30 सप्टेंबर (हिं.स.)।पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथे मुख्यमंत्री गोल्ड कप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कराचीतून क्वेटाला जात असलेल्या एका फुटबॉल संघाला बलुच महामार्गावर शस्त्रधारी दरोडेखोरांनी बंदुकीच्
क्वेटाला जात असलेल्या फुटबॉल संघाची शस्त्रधाऱ्यांकडून लूट; सुरक्षा इशाऱ्याकडे दुर्लक्ष महागात


इस्लामाबाद, 30 सप्टेंबर (हिं.स.)।पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथे मुख्यमंत्री गोल्ड कप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कराचीतून क्वेटाला जात असलेल्या एका फुटबॉल संघाला बलुच महामार्गावर शस्त्रधारी दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाकावर लुटले.

वृत्तानुसार, कराची जिल्हा पश्चिमचा फुटबॉल संघ बसने क्वेटाला जात होता. बस मस्तुंग आणि सरियाबदरम्यान पोहोचली असता १० ते १२ शस्त्रधारी व्यक्तींनी बस अडवली. त्यानंतर बंदुकीच्या धाकावर बसमधील प्रवाशांची लूट करण्यात आली.या घटनेबाबत संघाचे व्यवस्थापक झुल्फिकार अली भुट्टो यांनी सांगितले की, दरोडेखोरांनी सर्व प्रवाशांना जबरदस्तीने बसमधून खाली उतरवले. त्यानंतर त्यांचे मोबाईल फोन, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू लुटल्या. एवढेच नव्हे, तर विरोध करणाऱ्या काही प्रवाशांशी दरोडेखोरांनी गैरवर्तन करत मारहाणही केली.

लुटीनंतर पैसे आणि इतर सामान गमावलेले खेळाडू कसाबसा क्वेटाला पोहोचले. तेथे त्यांनी बलुचिस्तानच्या क्रीडामंत्र्यांना संपूर्ण घटनेची माहिती दिली. वृत्तानुसार, क्रीडामंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करत खेळाडूंच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली. तसेच त्यांच्यासाठी दैनंदिन भत्त्याचीही व्यवस्था करण्यात आली.

सिंध फुटबॉल असोसिएशनचे सचिव मोहम्मद आझम यांनी खुलासा केला की, या संघाने सुरक्षा इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले होते. त्यांनी सांगितले की, “आम्ही सिंधचा संघ पाठवला नव्हता. तसेच कराचीतील इतर सर्व क्लबनाही सुरक्षा परिस्थिती लक्षात घेता बस किंवा रेल्वेने क्वेटाला जाण्यास मनाई केली होती.”

मात्र, यानंतरही कराची पश्चिमचा संघ आपल्या निर्णयावर ठाम राहिला आणि क्वेटाला रवाना झाला. “ज्याची आम्हाला भीती होती, तेच घडले,” असे आझम यांनी सांगितले.सुरक्षेच्या कारणास्तव पंजाब आणि खैबर पख्तूनख्वा फुटबॉल असोसिएशननेही या स्पर्धेसाठी आपले संघ पाठवले नव्हते, अशी माहिती त्यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande