विमानाचे अपहरण केलेले नाही, फ्लायदुबईच्या विमानाचा मार्ग बदलल्याबाबत इस्रायलचे स्पष्टीकरण
जेरुसलेम, 30 सप्टेंबर (हिं.स.)। दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या एका प्रवासी विमानाचे अपहरण झाल्याची बातमी समोर आल्यानंतर इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने स्पष्टीकरण जारी केले. विमानाचे अपहरण झालेले नसून, ते सौदी अरेबियाच्या दिशेने वळवण्यात आले आणि त्य
विमान हायजॅक केलेले नाही, फ्लायदुबईच्या विमानाचा मार्ग बदलल्याबाबत इस्रायलचे स्पष्टीकरण


जेरुसलेम, 30 सप्टेंबर (हिं.स.)। दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या एका प्रवासी विमानाचे अपहरण झाल्याची बातमी समोर आल्यानंतर इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने स्पष्टीकरण जारी केले. विमानाचे अपहरण झालेले नसून, ते सौदी अरेबियाच्या दिशेने वळवण्यात आले आणि त्यानंतर विमानाने सुरक्षित लँडिंग केल्याचे पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले.

इस्रायलच्या वृत्तानुसार, उड्डाणादरम्यान विमानातून आपत्कालीन सिग्नल पाठवण्यात आला होता. या विमानात १५० हून अधिक प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि संरक्षणमंत्री इस्रायल काट्झ यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आपत्कालीन बैठक बोलावली.

बुधवारी सकाळी विमानाच्या मॅन्युअल लँडिंग आणि यू-टर्नदरम्यान काही काळासाठी आपत्कालीन सिग्नल पाठवण्यात आला. त्यामुळे विमानाचे अपहरण झाल्याचा संशय निर्माण झाला. त्यानंतर विमानाला सौदी अरेबियाच्या दिशेने वळवण्यात आले आणि त्याची उंचीही कमी करण्यात आली. इस्रायली लढाऊ विमाने तातडीने रवाना करण्यात आली.

काही मिनिटांच्या तणावपूर्ण परिस्थितीनंतर आणि इस्रायलमध्ये चिंता वाढल्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी परिस्थितीबाबत दिलासा देणारी माहिती दिली. विमान सौदी अरेबियातील तबूक विमानतळावर उतरण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर विमान तेथे सुरक्षितपणे उतरल्याची माहिती समोर आली.

‘फ्लायदुबई’ने नंतर स्पष्ट केले की, विमानातील वैमानिकांमध्ये झालेल्या भांडणामुळे आपत्कालीन सिग्नल पाठवण्यात आला होता. या घटनेनंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि संरक्षणमंत्री इस्रायल काट्झ यांनी आपत्कालीन सुरक्षा बैठक बोलावली. मात्र, एका सुरक्षा अधिकाऱ्याने नंतर स्पष्ट केले की, “विमानाचे अपहरण झाल्याची कोणतीही ठोस माहिती नाही. वैमानिकाने आपत्कालीन संकेत पाठवला होता.”

विमान फ्लाइट-ट्रॅकिंग ॲपवरून गायब झाल्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी विमान सौदी अरेबियाच्या भूमीवर उतरणार असल्याचे सांगत नागरिकांना आश्वस्त केले. काही वेळानंतर विमान सुरक्षितपणे उतरले आणि सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असलेल्या फ्लाइट-ट्रॅकिंग ॲपवर ते पुन्हा दिसू लागले.

‘फ्लायदुबई’च्या या विमानाने संयुक्त अरब अमिरातीतील दुबई येथून सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी उड्डाण केले होते. ते सकाळी साडेनऊच्या सुमारास बेन गुरियन विमानतळावर उतरणे अपेक्षित होते. मात्र, सुमारे दीड तासांच्या उड्डाणानंतर जॉर्डनच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच विमानाने ७७०० कोड प्रसारित केला. हा आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आणि संकटाचा संकेत आहे. त्यानंतर विमानाने ७५०० कोड प्रसारित केला, जो विमान अपहरणाचा संकेत मानला जातो.याच वेळी विमानाने यू-टर्न घेतला आणि पुन्हा सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश केला. त्यानंतर विमान कमी उंचीवरून उड्डाण करू लागले. दक्षिणेकडे जात असताना विमानाने सौदी अरेबियाच्या हद्दीत पश्चिमेकडे वळण घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande