
मॉस्को, 30 सप्टेंबर (हिं.स.)। रशियाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. रशियाचे टीयू-९५ बॉम्बर विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे. या दुर्घटनेत विमानातील दलाच्या सहा सदस्यांचा मृत्यू झाला आहे. हे विमान प्रशिक्षण मोहिमेदरम्यान दुर्घटनाग्रस्त झाले. विशेष म्हणजे, हे विमान अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम होते.
रशियाच्या सुदूर पूर्वेकडील अमूर प्रदेशातील निर्जन भागात हे बॉम्बर विमान दुर्घटनाग्रस्त झाले. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून दलातील एक सदस्य जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, दुर्घटनाग्रस्त बॉम्बरमध्ये कोणतीही शस्त्रे नव्हती. मात्र, विमान नेमके कोणत्या कारणामुळे दुर्घटनाग्रस्त झाले, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दुर्घटनेचे कारण शोधण्यासाठी तपास पथकाची स्थापना करण्यात आली असून हे पथक घटनास्थळी पाठवण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, टीयू-९५ बॉम्बरने उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच दुर्घटना झाली. विमान जमिनीवर आदळल्यानंतर त्याच्या इंधनाच्या टाकीत स्फोट झाला. त्यामुळे विमानाला आग लागली आणि त्याचा ढिगारा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
विमानात एकूण सात जण होते. त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला. यातील दोन जणांचा जखमांमुळे रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. उर्वरित एक सदस्य जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या दुर्घटनेच्या नेमक्या परिस्थितीबाबत अद्याप सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही.
रशियासाठी ही दुर्घटना महत्त्वाची मानली जात आहे. कारण दुर्घटनाग्रस्त झालेले टीयू-९५ हे अत्यंत शक्तिशाली बॉम्बर विमान असून ते अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे. त्यामुळे या दुर्घटनेच्या तपासातून अनेक महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. यापूर्वी अमेरिकेत प्रशिक्षणादरम्यान एफ-१६ लढाऊ विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते. या दुर्घटनेचा व्हिडिओही समोर आला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode