तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे गडचिरोली पोलिसांनी लावला हत्येचा छडा
गडचिरोली, ३० सप्टेंबर (हिं.स.) : कोणताही प्रत्यक्ष पुरावा उपलब्ध नसतानाही तपासातील बारकावे, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे गडचिरोली पोलिसांनी घोट पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत घडलेल्या क्लिष्ट खुनाचा छडा लावला आहे. या प्रकरणी संदीप रा
ताब्यातील आरोपीसह पोलिस


गडचिरोली, ३० सप्टेंबर (हिं.स.) : कोणताही प्रत्यक्ष पुरावा उपलब्ध नसतानाही तपासातील बारकावे, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे गडचिरोली पोलिसांनी घोट पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत घडलेल्या क्लिष्ट खुनाचा छडा लावला आहे. या प्रकरणी संदीप रावजी टेकाम (वय ३५, रा. नारायणपूर चक क्रमांक २) याला पोलिसांनी अटक केली आहे.

नारायणपूर येथील गोपीकाबाई रामचंद्र गायकवाड (वय ६०) या ५ सप्टेंबर २०२६ रोजी शेतात गेल्या होत्या. मात्र, सायंकाळपर्यंत त्या घरी परतल्या नाहीत. त्यानंतर नातेवाईक व ग्रामस्थांनी शोध घेतला असता त्यांचा मृतदेह शेतात संशयास्पद अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी चामोर्शी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १०३ (१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचा कोणताही ठोस प्रत्यक्ष पुरावा नसल्याने तपास पोलिसांसमोर आव्हानात्मक ठरला होता. पोलीस अधीक्षक एम. रमेश आणि अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची जबाबदारी सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्याकडे सोपविण्यात आली.

तपासादरम्यान सहायक पोलीस अधीक्षक हिरडे यांनी मृतदेहावरील जखमांचे बारकाईने निरीक्षण केले. जखमांच्या स्वरूपावरून हल्ला करणारी व्यक्ती डावखुरी असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. या दिशेने तपास पुढे नेत पोलिसांनी कौटुंबिक संबंध, तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे संदीप टेकाम याच्यावर संशय घेतला.

पोलिसांच्या चौकशीत आरोपीने जुन्या वैमनस्यातून काठीने मारहाण करून तसेच दगडाने ठेचून गोपीकाबाई गायकवाड यांचा खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

संदीप टेकाम याला अटक करण्यात आली. त्याला प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी, चामोर्शी यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी. आणि सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे, सहायक पोलीस निरीक्षक भगतसिंग दुलत, सहायक पोलीस निरीक्षक आगलावे, घोट पोलीस मदत केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक कल्पेश खारोडे, सहायक पोलीस निरीक्षक गवळी, पोलीस उपनिरीक्षक विश्वा कराळे तसेच पोलीस अंमलदारांनी तपासात सहभाग घेतला.क्लिष्ट खुनाचा तपास कौशल्याने पूर्ण करून आरोपीपर्यंत पोहोचल्याबद्दल पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी तपास पथकाचे विशेष कौतुक केले.

--------------------------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande