
परभणी, 30 सप्टेंबर (हिं.स.)। शहरातील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्टेडियम मैदानावर महापालिकेच्या वतीने आयोजित आंतरशालेय क्रीडा स्पर्धा 2026-27 अंतर्गत क्रिकेट स्पर्धा पार पडली. विविध वयोगटांतील खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला.
महापालिकेच्या वतीने यंदा एकूण 48 क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली असून आतापर्यंत सुमारे 1 हजार 800 खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी क्रीडा पंच आशिष सूर्यवंशी, महापालिकेचे क्रीडा विभागप्रमुख नजम खान, क्रीडा शिक्षक मेढ, कदम, मुदगलकर, ज्ञानोपासक महाविद्यालयाचे क्रीडा विभागप्रमुख डॉ. पंडित तसेच श्री शिवाजी महाविद्यालयाचे राजू रेंगे उपस्थित होते. लेखाधिकारी अमोल जाधव यांनी फलंदाजी करून, तर माहिती व जनसंपर्क विभागप्रमुख राजकुमार जाधव यांनी गोलंदाजी करून स्पर्धेचे उद्घाटन केले. स्पर्धेत 14 व 17 वर्षांखालील मुले व मुली तसेच 19 वर्षांखालील मुली आणि मुले अशा विविध वयोगटांत सामने घेण्यात आले. एकूण 20 शाळा आणि तीन महाविद्यालयांच्या संघांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. यावेळी माहिती व जनसंपर्क विभागप्रमुख राजकुमार जाधव यांनी खेळाडूंशी हस्तांदोलन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांनी विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहायक आयुक्त गजानन जाधव, क्रीडा अधिकारी नजम खान, लिपिक हैबती यांच्यासह क्रीडा विभागातील अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis