
नवी दिल्ली, 04 सप्टेंबर (हिं.स.)। दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी)च्या प्रदर्शनात सहभागी निशू आझाद यांचे वडील संजय यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या आणि आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी शुक्रवारी संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर विविध समूहांनी धरणे आंदोलन केले.
या धरणे आंदोलनात काँग्रेस, अपक्ष खासदार पप्पू यादव, डाव्या पक्षांचे विद्यार्थी नेते तसेच भीम आर्मीचे कार्यकर्ते सहभागी झाले. अपक्ष खासदार पप्पू यादव पीडित निशू आझाद आणि त्यांच्या समर्थकांसोबत तेथे बसले. यावेळी आंदोलकांनी दिल्ली पोलीस आणि केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांचा आरोप आहे की, निशू आझाद यांच्या वडिलांवर दोन महिन्यांपूर्वी जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. घटनेच्या वेळी निशू आझाद यांनी दिल्ली पोलिसांकडे न्याय मिळवून देण्याची आणि दोषींना अटक करण्याची मागणी केली होती. मात्र, दोन महिने उलटून गेल्यानंतरही आरोपी खुलेआम फिरत आहेत आणि आपण केलेला गुन्हा स्वीकारत आहेत.
आंदोलकांची मागणी आहे की, आरोपींनी स्वतः हल्ला केल्याचे मान्य केले आहे, त्यामुळे त्यांना तातडीने अटक करून त्यांच्यावर हत्येचा प्रयत्न करण्यासह कठोरातील कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात यावा. दरम्यान, सीजेपी नेते आशुतोष रांका आणि सौरभ दास हे देखील आंदोलनस्थळी पोहोचले. रांका यांनी माध्यमांना सांगितले की, सौरभ आणि त्यांची संपूर्ण टीम सातत्याने दिल्ली पोलिसांकडे आरोपींना तातडीने अटक करण्याची आणि त्यांच्यावर हत्येच्या प्रयत्नाची कलमे लावण्याची मागणी करत आहे.
त्यांनी आरोप केला की, दिल्ली पोलीस भाजप नेते आणि कपिल मिश्रा यांच्या इशाऱ्यावर काम करत असून आरोपींना वाचवत आहेत. रांका यांनी सवाल केला की, शांततापूर्ण आंदोलन रोखण्यासाठी पोलिसांची मोठी फौज तैनात केली जाऊ शकते, तर त्या दलाच्या दहाव्या हिस्स्याएवढेही बळ खुलेआम गुन्हा कबूल करणाऱ्या गुंडांना पकडण्यासाठी का वापरले गेले नाही? धरणे आंदोलनात बसलेले अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी दिल्ली पोलीस आणि सरकारच्या कार्यपद्धतीवर तीव्र हल्ला चढवत सवाल केला की, आपल्या मुली आणि दलितांवर अशाच प्रकारे अत्याचार केले जाणार का? हे सरकार महिला, अल्पसंख्याक आणि दलितांच्या विरोधात आहे. अखेर या देशाच्या मुलीला न्याय का दिला जात नाही? ते म्हणाले की, पोलीस, गुन्हेगार आणि सत्ताधारी पक्ष यांच्यातील हे संगनमत लोकशाही आणि संविधान संपवण्याच्या दिशेने काम करत आहे, जे अजिबात सहन केले जाणार नाही.
दरम्यान, काँग्रेस खासदार नसीर हुसैन यांनीही सरकार आणि पोलिसांच्या हेतूवर प्रश्न उपस्थित करत पीडित कुटुंबाला पाठिंबा दिला. त्यांनी सांगितले की, ज्या-ज्या नागरिकांवर अन्याय झाला आहे, त्या प्रत्येक नागरिकासोबत काँग्रेस ठामपणे उभी आहे.
उल्लेखनीय आहे की, संजय आझाद यांच्यावर कथितरित्या हल्ला करणाऱ्या स्वतंत्र भारद्वाज यांचा नुकताच एक व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी काही दावे केले होते, ज्याला सोशल मीडियावर आझाद समर्थकांनी कबुलीजबाब असल्याचे म्हटले. त्यांचा सवाल होता की, स्वतंत्रला पोलिसांनी का सोडले आणि त्यांच्यावर हत्येची कलमे का लावण्यात आली नाहीत?
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule