ज्युनियर हॉकी आशिया कप : भारतीय संघाची दक्षिण कोरियावर ७-३ ने मात
मोकी, चीन, ८ सप्टेंबर, (हिं.स.)भारतीय ज्युनियर पुरुष हॉकी संघाने दक्षिण कोरियाला ७-३ ने हरवून एएचएफ ज्युनियर आशिया कप २०२६ मध्ये आपली प्रभावी कामगिरी सुरू ठेवली आहे. या विजयामुळे भारत सात गुणांसह ''पूल ए'' मध्ये अव्वल स्थानी कायम आहे आणि उपांत्य
भारतीय ज्युनियर हॉकी संघ


मोकी, चीन, ८ सप्टेंबर, (हिं.स.)भारतीय ज्युनियर पुरुष हॉकी संघाने दक्षिण कोरियाला ७-३ ने हरवून एएचएफ ज्युनियर आशिया कप २०२६ मध्ये आपली प्रभावी कामगिरी सुरू ठेवली आहे. या विजयामुळे भारत सात गुणांसह 'पूल ए' मध्ये अव्वल स्थानी कायम आहे आणि उपांत्य फेरीच्या स्थानाच्या जवळ पोहोचला आहे.

गतविजेत्या भारताने तीन सामन्यांतून दोन विजय आणि एका बरोबरीसह सात गुण मिळवले आहेत. दक्षिण कोरियाविरुद्धच्या सामन्यात, भारतीय संघाला पहिल्या तीन क्वार्टर्समध्ये कडव्या आव्हानाचा सामना करावा लागला, पण तिसऱ्या क्वार्टरच्या शेवटच्या सत्रात आघाडी घेतल्यानंतर, त्यांनी अंतिम क्वार्टरमध्ये तीन गोल करून सामन्याचे चित्र पूर्णपणे पालटले.

भारताचा कर्णधार आणि स्टार ड्रॅगफ्लिकर अनमोल एक्का पुन्हा एकदा संघाचा सर्वात प्रभावी खेळाडू ठरला. त्याने दोन गोल करून स्पर्धेतील आपल्या गोलची संख्या आठवर नेली. अनमोलने पाचव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली. मात्र, पुढच्याच मिनिटात दोह्योन चोईने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून दक्षिण कोरियाने बरोबरी साधली.

दुसऱ्या क्वार्टरमध्ये, १८ व्या मिनिटाला लोवेनूर सिंगने मैदानी गोल करून भारताला पुन्हा आघाडी मिळवून दिली, पण पुढच्याच मिनिटाला ह्योगुक यूने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून दक्षिण कोरियाला २-२ अशी बरोबरी साधून दिली. मात्र, मध्यंतरापूर्वी भारताने पुन्हा आघाडी घेतली. २० व्या मिनिटाला अजित यादवने गोल करून भारताला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली.

तिसऱ्या क्वार्टरमध्येही दक्षिण कोरियाने दबाव कायम ठेवला आणि ३६ व्या मिनिटाला ह्योगुक यूने त्यांचा दुसरा गोल करून स्कोअर ३-३ असा बरोबरीत आणला. त्यानंतर ४२ व्या मिनिटाला प्रभदीप सिंगच्या गोलने भारताने पुन्हा आघाडी घेतली, ज्यामुळे तिसऱ्या क्वार्टरच्या अखेरीस स्कोअर ४-३ असा झाला.

अंतिम क्वार्टरच्या सुरुवातीच्या टप्प्यात दोन्ही संघांनी वारंवार हल्ले चढवले, पण भारताने ५५ ते ५८ मिनिटांच्या दरम्यान तीन गोल करून सामन्याचे चित्र पूर्णपणे पालटून टाकले. गुरसेवक सिंगने ५५ व्या मिनिटाला गोल करून भारताची आघाडी ५-३ अशी वाढवली. एका मिनिटानंतर, अनमोल एक्काने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करून भारताला ६-३ अशी आघाडी मिळवून दिली. आर्यन एक्सने ५८ व्या मिनिटाला सातवा गोल करून भारताचा ७-३ असा विजय निश्चित केला.

या पराभवानंतर दक्षिण कोरियाचे सहा गुण झाले आहेत. त्यांचा 'पूल ए' मधील शेवटचा सामना जपानविरुद्ध होईल. चार गुणांसह जपान उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम असून, मंगळवारी त्यांचा सामना इंडोनेशियाशी होईल.

भारत बुधवारी आपल्या 'पूल'मधील शेवटच्या सामन्यात चायनीज तैपेईचा सामना करेल. भारतीय संघ आता हा सामना जिंकून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न करेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande