पुणे, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। राज्यात सध्या जाती-धर्मांमध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, धर्मावरचे राजकारण काही दिवस चालेल. मात्र, फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारा आणि अठरापगड जातींना सोबत घेऊनच भविष्यात पुढे जावे लागेल. त्यादृष्टीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सर्व घटकांना समान न्याय दिला जाईल,’असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. या वेळी आमदार शंकर मांडेकर, पक्षाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, शुक्राचार्य वांजळे आदी उपस्थित होते.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुरोगामी विचारांवर श्रद्धा ठेवली. राज्याचे प्रश्न सोडविताना पुणे जिल्हा सर्वात पुढे कसा राहील, यावर कायम भर दिला. यशवंतराव चव्हाण यांनी कायम सुसंस्कृत राजकारण केले, विरोधकांचाही सन्मान ठेवला. राजकारणात सुसंस्कृत भाषा आणि परस्पर आदर आवश्यक आहे.’’
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु