अकोला : आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात तक्रार!
अकोला, 11 ऑक्टोबर (हिं.स.)।राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) यांच्या वतीने प्रादेशिक संघटक सचिव व समाजसेवक जावेद जकरिया यांनी सोलापुर येथे झालेल्या मोर्च्यात अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या धार्मिक द्वेष पसरविणाऱ्या वक्तव्य
प


अकोला, 11 ऑक्टोबर (हिं.स.)।राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) यांच्या वतीने प्रादेशिक संघटक सचिव व समाजसेवक जावेद जकरिया यांनी सोलापुर येथे झालेल्या मोर्च्यात अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या धार्मिक द्वेष पसरविणाऱ्या वक्तव्याविरोधात औपचारिक तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार रामदासपेठ पोलीस स्टेशन, अकोला येथे पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांच्याकडे देण्यात आली असून त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

तक्रारीनुसार, १० ऑक्टोबर २०२५ रोजी सोलापुर येथे आमदार संग्राम जगताप यांनी आयोजित मोर्च्यादरम्यान सार्वजनिकपणे असे विधान केले की,

“दिवाळी सणाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकांनी खरेदी फक्त हिंदू लोकांच्या दुकानातून करावी. आपल्यादिवाळी खरेदीचा नफा केवळ हिंदू लोकांनाच मिळायला हवा. सध्या हिंदू मंदिरात अथवा हिंदूंवर होणारे हल्ले हे मशिदीमधून घडत आहेत...”हे विधान धार्मिक द्वेष, भेदभाव आणि आर्थिक बहिष्काराला प्रोत्साहन देणारे असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या विधानाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 मधील धारा 196, 198 आणि 353(2) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 मधील धारा 67 अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची मागणी करण्यात आली आहे.तक्रारीसोबत व्हिडिओचे स्क्रीनशॉट, मीडियातील रिपोर्ट आणि ओळखपत्रांच्या प्रती पुरावा म्हणून सादर करण्यात आल्या आहेत.

जावेद जकरिया यांनी सांगितले की,“समाजात एकता आणि सौहार्द टिकवणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. धार्मिक द्वेष वाढविणाऱ्या विधानांविरोधात कठोर कारवाई व्हावी, हीच आमची मागणी आहे.”या तक्रारीची पोलिसांनी नोंद घेतली असून तपास सुरू करण्याचे आणि आवश्यक ती पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांनी दिले आहे.ही तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अकोला महानगर अध्यक्ष रफीक सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखाली दाखल करण्यात आली. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande