अमरावती, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या 'लाडकी बहीण' योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेत महिलांना प्रचंड अडचणी येत आहेत. १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर असा दोन महिन्यांचा कालावधी दिला असला तरी, ऑनलाइन पोर्टल आणि सर्व्हरच्या सततच्या खंडित सेवांमुळे लाखो लाभार्थी महिलांना तासन्तास वाट पाहावी लागत आहे. अमरावती सह राज्यभरातील सेवा केंद्रांवर गर्दी वाढली असून, शासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. मोठ्या गाजावाजाने १५ महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या योजनेतून महिलांना दरमहा १,५०० रुपयांचे अनुदान मिळते. मात्र, नव्या नियमांनुसार ई-केवायसी अनिवार्य झाल्याने महिलांचा समावेश धोक्यात आहे. सेवा केंद्रांवर (आपले सरकार, महा ई-सेवा) गर्दी वाढली असून, अनेक महिला रात्रंदिवस मोबाइलवर प्रयत्न करत आहेत. शहारातील ई-सेवा केंद्रांवर (कॅम्प, कोथरूड, हडपसर) महिलांच्या रांगा लागल्या आहेत. आधार नंबर टाकला की एरर, ओटीपी आलं तरी एंटर करण्याचा पर्याय नाही, अशी तक्रार अनेक जण करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी