कोल्‍ड्रीफ कफ सिरप : राज्यात १०७ विक्रेत्‍यांचे परवाने निलंबित
पुणे, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। कोल्‍ड्रीफ’ कफ सिरपच्‍या सेवनाने बालकांचा मृत्‍यू झाल्‍यावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभरात डॉक्‍टरांच्‍या चिठ्ठीशिवाय (प्रिस्क्रिप्शन) कफ सिरपची विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. याप्रक
कोल्‍ड्रीफ कफ सिरप : राज्यात १०७ विक्रेत्‍यांचे परवाने निलंबित


पुणे, 11 ऑक्टोबर (हिं.स.)।

कोल्‍ड्रीफ’ कफ सिरपच्‍या सेवनाने बालकांचा मृत्‍यू झाल्‍यावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभरात डॉक्‍टरांच्‍या चिठ्ठीशिवाय (प्रिस्क्रिप्शन) कफ सिरपची विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. याप्रकरणी पुण्‍यात २० औषधविक्रेत्‍यांवर कारणे दाखवा नोटीस व निलंबनाची कारवाई केली आहे. पुणे जिल्‍हा औषध विक्रेत्‍या संघटनेने केवळ औषध विक्रेत्‍यांवरच लक्ष केंद्रित न करता, बनावट औषधे तयार करणाऱ्या कंपन्‍या व ऑनलाइन औषधविक्री करणाऱ्या कंपन्‍यांवरही कारवाईचा बडगा उगारण्‍यात यावा, अशी मागणी ‘एफडीए’कडे केली आहे.

मध्‍य प्रदेशात ‘कोल्‍ड्रीफ’ पिल्यानंतर ९ हून अधिक बालकांचा मृत्‍यू झाला. या कफ सिरपमध्‍ये ‘डायथीलिन ग्‍लायकॉल’ हे विषारी रसायन आढळून आले. त्‍यानंतर ‘एफडीए’ने या कफ सिरपची विक्री व वितरण बंद केले. त्‍यानंतर देशभरात इतर कंपन्‍यांच्‍या कफ सिरपची तपासणी सुरू केली. त्‍यामध्‍ये ‘रेडनेक्स फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचे ‘रेसिफ्रेश टीआर’ व ‘शेप फार्मा प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचे ‘रिलाईफ’ या दोन कफ सिरपमध्‍ये प्रमाणापेक्षा जास्‍त ‘डायथीलिन ग्‍लायकॉल’ आढळले. त्‍यानंतर या दोन्‍ही कंपन्‍यांचा साठा प्रतिबंधित करून, त्‍याच्‍या वितरणावर देशभरात बंदी घातली. त्‍यानंतर ‘रेसिफ्रेश टीआर’चा १३ लाख रुपयांचा साठा पुण्‍यात जप्त केला आहे.

दरम्‍यान, ‘पुणे एफडीए’ने इतर कंपन्‍यांच्‍या कफ सिरपचे नमुने गोळा करण्‍याची व त्‍यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्‍याची मोहीम सुरू केली आहे. ही तपासणी करत असताना काही औषध विक्रेते हे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे विक्री करत असल्याचे आढळून आले. विशेषतः कफ सिरप आणि सर्दी-खोकल्याच्या उपचारासाठी वापरली जाणारी काही औषधे ही गैरवापराच्या धोक्यात असल्याने त्यावर प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यानुसार पुणे शहर व जिल्ह्यातील २२ औषध विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली. २० प्रकरणांमध्ये नियमभंग आढळून आला आहे. त्‍यापैकी काहींना कारणे दाखवा नोटीस तर काहींवर निलंबनाची कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे विभागाचे सह आयुक्‍त गिरीश हुकरे यांनी दिली.

विना प्रिस्क्रिप्शन औषधे देणाऱ्या राज्‍यातील ८८ औषध विक्रेत्यांना औषधांची विक्री त्वरित बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच १०७ औषध विक्रेत्यांचे औषध विक्रीचे परवाने निलंबित किंवा रद्द का करू नयेत, यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande