सोलापूर, 11 ऑक्टोबर (हिं.स.)।सीना नदीला आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील माढा, करमाळा, मोहोळ, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर या सहा तालुक्यांतील नागरिकांना फटका बसला. यात 12 हजार 300 पूरबाधित कुटुंबांना दिवाळी कीट दिले जाणार आहे, त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून दोन कोटी 49 लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
पूरबाधितांना जिल्हा नियोजन समिती निधीतून व भाजप पदाधिकारी यांच्याकडून स्वतंत्रपणे एकूण दोन कीट देण्यात येणार आहेत. या कीटमध्ये दिवाळीसाठी आवश्यक सर्व साहित्य असणार असून त्यांना दिवाळीसाठी काहीच खरेदी करावी लागणार नाही, याची दक्षता घेण्यात आल्याचे पालकमंत्री म्हणाले.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पालकमंत्री गोरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आ. सुभाष देशमुख, आ. समाधान आवताडे, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड