पुणे, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। 'प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजने'चा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतरत्न सी. सुब्रमण्यम सभागृह, पुसा, नवी दिल्ली येथून दूरदृष्यप्रणालीद्वारे झाला. प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजनेत राज्यातील ९ जिल्ह्यांची निवड झाली असून केंद्राच्या व राज्य शासनाच्या योजनांच्या माध्यमातून तेथील शेतकऱ्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते 'प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजने'च्या दूरदृष्य प्रणालीद्वारे शुभारंभानिमित्त पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात कृषीमंत्री श्री. भरणे बोलत होते. यावेळी आमदार बापू पठारे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषी संचालक विनयकुमार आवटे, रफिक नायकवडी, सुनील बोरकर, अशोक किरनळ्ळी, सहसंचालक दत्तात्रय गावसाने आदींसह राज्यातील कृषी सखी, प्रगतिशील महिला, पुरुष शेतकरी, कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून शेतकरी सक्षम व्हावा यादृष्टीने काम करत आहे. यावर्षी जून ते सप्टेंबरपर्यंत राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आला. त्याच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकाचा चक्काचूर झाला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांनी त्या भागात दौरे करून शेतकऱ्यांचे दु:ख, अडचणी जाणून घेतल्या. या शेतकरी बांधवांना उभे केले पाहिजे यादृष्टीने राज्य शासनाने चांगले पॅकेज जाहीर केले आहे.
अनेक ठिकाणी नदीकडेला शेतीत माती राहिली नाही, वीजरोहित्र (ट्रान्सफॉर्म), वीजपंप राहिले नाहीत. त्यामुळे या नुकसानीसाठी साधारणत: ३१ हजार ६२७ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. अजूनही त्यात काही बाबींचा समावेश करण्यात येईल. यात कोरडवाहू शेतीला १८ हजार ५०० रूपये, हंगामी बागायत शेतीला २७ हजार आणि बागायती शेतीला ३२ हजार ५०० रुपये हेक्टरी असे आणि रब्बीसाठी पाणी उपलब्ध आहे अशा ठिकाणी १० हजार कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
राज्यात ३ हजार ५०० कृषी सखी काम करत असून त्या स्वत: प्रशिक्षण घेऊन तेथील महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. त्याचा अभिमान असून कृषी समृद्धी योजनेच्या माध्यमातून राज्य शासनाने कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सुरू केलेल्या मोठ्या योजनेची माहिती घेऊन सेंद्रीय शेतीमधील तंत्रज्ञान, कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी, शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीसाठी कृषी सखींनी मार्गदर्शन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु