पुणे, 11 ऑक्टोबर (हिं.स.)।
पीएमपी प्रशासनाने शहरात डबलडेकर बसची यशस्वी चाचणी पूर्ण केल्यानंतर आता डबलडेकरच्या नियमित सेवेसाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. येत्या जानेवारीत २५ बस भाडेतत्त्वावर पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणार असून पाच मार्गांवर या बस धावतील. याचे तिकीट दर मात्र ई-बस इतकेच असणार आहे. पहिल्या टप्प्यात देहू ते आळंदी, मगरपट्टा ते खराडी, हिंजवडी ते हिंजवडी फेज ३, रामवाडी ते पुणे विमानतळ आणि चिंचवडगाव ते हिंजवडी या पाच मार्गांचा समावेश केला आहे. जानेवारीच्या अखेरपर्यंत या पाच मार्गांवर प्रत्येकी पाच, अशा एकूण २५ बस धावणार आहेत. या बससाठी प्रवाशांना कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.नवीन डबलडेकर बस इलेक्ट्रिक आहेत. पर्यावरणपूरक वाहतुकीच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या बसमुळे गर्दीच्या मार्गांवरील प्रवाशांना दिलासा मिळेल तसेच शहरातील सार्वजनिक वाहतुकीचे आधुनिकीकरणास मदत होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु