परभणी, 11 ऑक्टोबर (हिं.स.)।
समर्थ चेस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपली चमक दाखवली आहे. संभाजीनगर विभागीय स्तरावरील अंडर-19 बुद्धिबळ स्पर्धेत परभणीच्या दोन खेळाडूंनी उल्लेखनीय यश मिळवले आहे.
अंडर-19 मुले वयोगटात दत्ता ज्ञानेश्वर जाधव (बाल विद्या मंदिर, परभणी) आणि अंडर-19 मुली वयोगटात श्रेया राजेश पारिपेल्ली (श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी) यांनी आपापल्या गटात उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे.
ही दोन्ही खेळाडू आगामी राज्यस्तरीय स्पर्धेत परभणी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार असून, त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
त्यांना राष्ट्रीय बुद्धिबळ पंच अनुराज रासकटला यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रशिक्षणाखाली या दोन्ही विद्यार्थ्यांनी सातत्य, शिस्त आणि एकाग्रतेच्या जोरावर हे यश मिळवले आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल समर्थ चेस अकॅडमीचे प्रमुख, पालकवर्ग व क्रीडा प्रेमींनी दोन्ही विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले असून राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट यश संपादन करतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis