सोलापूर, 11 ऑक्टोबर (हिं.स.)।
अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या करमाळा तालुक्यात मदतीचा हात पुढे करत भाजयुमो पिंपरी-चिंचवडच्या वतीने एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.
या उपक्रमाचे प्रेरणास्थान आमदार महेश लांडगे असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सामाजिक जबाबदारी पार पाडली जात आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धान्य, अन्नधान्य, कपडे, औषधे आणि जीवनावश्यक वस्तू घेऊन मदतीचा ट्रक शुक्रवारी मोशी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र येथून रवाना करण्यात आला.
करमाळा तालुक्यात खडकी ग्रामपंचायत आहे. या ठिकाणी मदतकार्य करण्यात आले. गावचे सरपंच उमाकांत बरडे, उपसरपंच अशोक देशमुख यांचे मदत वितरण करण्यासाठी सहकार्य झाले. या गावामध्ये एकूण 510 मदत किटचे वितरण केले आहे. यावेळी गावातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहून सामाजिक कार्यात सहभाग घेतला. एक हात मदतीचा या उपक्रमाविषयी गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, समाजातील प्रत्येक घटकाने अशा संकटाच्या काळात एकत्र येणे हीच खरी सेवा असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. पूरग्रस्तांना दिलासा देणारा आणि युवकांना समाजकार्याची जाणीव करून देणारा एक हात मदतीचा उपक्रम भविष्यातील सामाजिक कार्यासाठी एक प्रेरणास्त्रोत ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड