अमरावती, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अमरावती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी आरक्षणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी आशिष येरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि महिलांसाठीच्या जागा निश्चित करण्यासाठीची आरक्षण सोडत सोमवारी (१३ ऑक्टोबर) जिल्हा आणि तालुकास्तरावर आयोजित करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या जागांसाठीची आरक्षण सोडत दि. १३ ला सकाळी १०.३० वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे काढण्यात येणार आहे.याच दिवशी सकाळी १०.३० वाजता धारणी, चिखलदरा, अंजनगांव सुर्जी, चांदुर बाजार, वरुड, तिवसा, अमरावती, धामणगांव रेल्वे आणि नांदगांव खंडेश्वर या पंचायत समित्यांची आरक्षण सोडत संबंधित तहसिल कार्यालयांमध्ये घेण्यात येईल. तर, दुपारी ३ वाजता दर्यापूर, अचलपूर, मोर्शी, भातकुली आणि चांदुर रेल्वे या पंचायत समित्यांची सोडत संबंधित तहसिल कार्यालयांमध्ये काढली जाईल. जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीच्या या आरक्षण सोडत कार्यक्रमास ज्या रहिवाशांना उपस्थित राहायचे आहे, त्यांनी वरील नमूद ठिकाणी व वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी