सोलापूर, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। अतीवृष्टी झाली, पूरपरिस्थिती निर्माण झाली, पिकांचे, द्राक्ष बागांचे नुकसान झाले. पण शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी मंत्रालयात प्रयत्न केले. विधानसभेत राऊतांचा झालेला पराभव एक अपघात होता. आता जिल्हा परिषद,पंचायत समिती, नगरपरिषद, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका जाहीर होणार असून, ऑक्टोबर महिना अखेर आचारसंहिता सुरु होईल. असे प्रतिपादन राज्याचे ग्रामीण विकास पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले. लक्ष्मी-सोपान कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात भारतीय जनता पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते मेळाव्यात ना. गोरे मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार राजेंद्र राऊत, भाजप शहर अध्यक्ष महावीर कदम, माजी नगराध्यक्ष असिफ तांबोळी, रमेश पाटील, प्रशांत कथले, भारत पवार, अॅड. राजश्री डमरे-तलवाड आदी उपस्थित होते. पालकमंत्री गोरे पुढे म्हणाले की, आगामी होणाऱ्या निवडणुकांमध्ये जोमाने कामाला लागा, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, नगराध्यक्ष भाजपचाच झाला पाहिजे. परीक्षेची वेळ आली आहे, विधानसभा निवडणुकीचे मंथन केले पण तालुक्याचा विकास खंडित झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड