बीड, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील रस्ते आणि पुलाच्या दुरुस्ती संदर्भात प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या
अधिकाऱ्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड अध्यक्ष योगेश क्षीरसागर यांनी चर्चा केली.
बीड व शिरूर कासार तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक रस्ते आणि पूल वाहून गेले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अतिवृष्टीग्रस्त भागांचा पाहणी दौरा केला होता. त्या वेळी चौसाळा परिसरातील पुलांच्या दुरुस्तीसंदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्यानुसार प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता एम.एम. पाटील यांना परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना सादर करण्यास सांगितले. तसेच, आपणही पत्र दिले आहे.
या प्रस्तावात चौसाळा–पिंपळगाव घाट–वाढवण रस्ता (इजिमा-४८) साखळी क्र. ०/७७० आणि ४/१९० या ठिकाणी नवीन दोन पुलांचे बांधकाम करण्याचा समावेश आहे. तसेच, प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत येणाऱ्या ५० रस्ते आणि पुलांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असून, त्यांची देखभाल व दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. प्रलंबित कामांना गती देण्याबाबतही चर्चा झाली.
याशिवाय, देखभाल-दुरुस्तीच्या निकषात न बसणारे रस्ते व पूल दुरुस्त करण्यासाठी शासनाला तात्काळ प्रस्ताव पाठवून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता एम.एम. पाटील, उपअभियंता पी.बी. जोगदंड, उपअभियंता एच.डी. शिंदे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis