पुणे, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। आगामी महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून मिळालेली मतदार यादीच ग्राह्य धरली जाणार आहे. यापूर्वीप्रमाणे जिल्हा प्रशासनाकडून मतदार यादी घेता येणार नाही, अशी माहिती महापालिकेच्या निवडणूक विभागाचे उपायुक्त प्रसाद काटकर यांनी दिली.
१ जुलै २०२५ रोजी अंतिम केलेली मतदार यादी महापालिकेकडे आज प्राप्त झाली असून, त्यानुसार आता प्रभागनिहाय यादी तयार करण्याचे काम सुरू होणार आहे. मात्र, या याद्या प्रशासनास ऑनलाइन उपलब्ध झाल्या असल्या, तरी त्या डाउनलोड होण्यास उशीर होत असल्याचे चित्र आहे. त्याचा परिणाम मतदार याद्या कामांच्या विभाजनावर होणार आहे.
महापालिका निवडणुकीसाठी ३२ गावांसह नव्याने तयार झालेल्या ४१ प्रभागांतून १६५ नगरसेवक निवडले जाणार आहेत. प्रभाग क्रमांक ३८ बालाजीनगर-कात्रज-आंबेगाव हा पाच सदस्यांचा सर्वांत मोठा प्रभाग असून, त्याची लोकसंख्या १ लाख २३ हजार आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी मतदान केंद्रांची संख्या वाढविण्यात येत असून, ती सुमारे ५ हजारांपर्यंत जाणार आहे. मतदान केंद्रांसाठी योग्य जागा निवडणे आणि आवश्यक सुविधा पुरविण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.
शासनाने १ जुलै २०२५ रोजी अंतिम केलेली मतदार यादीच पुण्यासह इतर महापालिकांसाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सुमारे ३५ लाख मतदारांची यादी पुणे महापालिकेला उपलब्ध झाली असून, त्यावर आधारित प्रभागनिहाय विभागणी लवकरच करण्यात येणार आहे. त्यानंतरच कोणत्या प्रभागात सर्वाधिक मतदार आहेत, हे स्पष्ट होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु