पुणे, 12 ऑक्टोबर (हिं.स.)। श्रीक्षेत्र भीमाशंकरला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी रोप-वे प्रकल्पासाठी सुमारे 200 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये केबल प्रणाली, दोन प्रवासी स्थानके, पार्किंग व्यवस्था, तिकीट कक्ष, सुरक्षा नियंत्रण आणि आपत्कालीन यंत्रणा यांचा समावेश असेल.रोप-वे उभारणीसाठी काही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी प्राथमिक रुची दाखवली असून, तांत्रिक तपशील अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. एकदा मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामास 2 ते 3 वर्षे लागण्याची शक्यता आहे. सरकारकडून पर्यावरणीय मंजुरी, वन विभागाची परवानगी आणि स्थानिक ग्रामपंचायतींचा सल्ला घेतल्यानंतर प्रकल्पाचे अंतिम रूप निश्चित केले जाणार आहे. रोप-वे प्रवासासाठी दर साधारण 50 ते 200 दरम्यान ठेवण्याचा विचार आहे, जे सर्वसामान्य भाविकांसाठी परवडणारे ठरेल.प्रवाशांसाठी वातानुकूलित गोंडोला (केबिन), उच्च सुरक्षा यंत्रणा, आपत्कालीन बेकिंग सिस्टिम, वीज बॅकअप आणि प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध राहतील. रोप-वेच्या स्थानकाजवळ पार्किंग, शौचालय, माहिती केंद्र, भोजनालय आणि धार्मिक साहित्य विक्री केंद्र उभारले जाणार आहे. त्यामुळे भीमाशंकर हे केवळ धार्मिक नव्हे तर पर्यटनदृष्ट्या आकर्षण बनण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु